दापोली-पावनळमधील घटना
वार्ताहर/ टाळसुरे
दापोली तालुक्यातील पावनळ येथे सुशांत परब या तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजता उघडकीस आली. दापोली पोलिसांनी या प्रकरणी तपास करून सुशांतचा खून त्याच्याच मित्राने केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी मित्राला अटक करण्यात आली असून मात्र हा खून का करण्यात आला, याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
या बाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जानेवारी रोजी करंजाळी येथे सकाळी 11.30 च्या सुमारास अनिल रामाणे हे शेतीचे कवळ तोडण्यासाठी पावनळ व करंजाळी सीमेलगत काटवड येथे गेले असता त्यांना एका पुरुषाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला. त्यांनी ही बाब पोलीस पाटील प्रकाश मोरे यांना सांगितली. मोरे यांनी याची माहिती दापोली पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर हा मृतदेह सुशांत किशोर परब याचा असल्याचे निष्पन्न झाले,
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपासास सुरुवात केल्यावर सुशांत हा त्याच्या आजीकडे करंजाळी डिंगणकरवाडी येथे रहात होता. त्याचा अंधेरी (मुंबई) येथील मित्र जयकिसन ओमप्रकाश सिंग हा त्याला भेटायला 1 जानेवारी रोजी रात्री करंजाळी येथे आला होता. रात्रीचे जेवण करून दोघे बाहेर पडले. त्यानंतर जयकिसन याने सुशांतचा काटा काढला. त्याचे अंगावरील सर्व कपडे काढले व ते मृतदेहापासून सुमारे 20 ते 25 फुटावर असलेल्या झाडावर अडकवून ठेवले. त्यानंतर जयकिसन सकाळी सुशांतच्या घरी आला व त्याच्या आजीला आपण मुंबईला जात असल्याचे सांगून बाहेर पडला. सुशांतचा मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला.
सुशांत व जयकिसन हे दोघे रात्री बाहेर पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना मोबाईल कॉलच्या लोकेशनवरून जयकिसन हा खेड येथे असल्याचे समजले. पोलिसांनी खेड येथील एका लॉजमधून त्याला ताब्यात घेतले. जयकिसन याला अंमली पदार्थाचे व्यसन असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. सुशांत याचे वडील मुंबईत रहात असून मंगळवारी सकाळी ते दापोलीत आल्यावर त्यांनी सुशांतचा खून झाला असल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार जयकिसनविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करत आहेत.









