कोकणात खळबळ
चिपळूण : वार्ताहर
चिपळूण शहरानजीक धामणवणे येथील जिल्हा परिषदेच्या निवृत्त शिक्षिका श्रीमती वर्षा वासुदेव जोशी (६४) यांचा त्यांच्या घरातच खून झाल्याचे उघड झाले आहे. हात-पाय बांधलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला असून नाक-तोंड दाबून त्यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खुनाच्या घटनेने चिपळूण शहरात खळबळ उडाली असून तपासासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळी पोलीस आणि शीघ्र कृती दल तैनात आले आहे. पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरु केला असून श्वानाने जंगलाचा मार्ग दाखविला. श्रीमती जोशी यांच्या पतीचे २०११ मध्ये निधन झाले असून त्या घरी एकट्याच राहत होत्या. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.









