संशयिताचा घटनास्थळावरून पळ ; पणजी पोलिसांकडून शोधाशोध
पणजी : भाटले – पणजी येथील श्रीराम मंदिराच्या पाठीमागील बाजूस नव्यानेच सुरू असलेल्या एका इमारतीत सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना घडली. खून केल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला आहे. याबाबत माहिती अशी की, भाटले येथील राम मंदिरानजिकच एका चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सोमवारी रात्री जॉन नामक मजुरावर अरविंद तिवारी याने चाकूने वार केले. या प्रकारावेळी तिथे जेवण बनविणाऱ्या अन्य एका मजुराने घटनास्थळावरून भीतीने धूम ठोकली. त्यानंतर त्याने या घडल्या प्रकाराची आपल्या मालकाला माहिती दिली. खून केल्यानंतर अरविंद तिवारी हा पसार झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, पणजी पोलिसस्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर, पोलिस निरीक्षक दीपेश शेटकर व अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ठसे
तज्ञांनाही पोलिसांनी पाचारण केले होते. पोलिसांनी खुनाचा तपास करून पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी इस्पितळात पाठवून दिला आहे. ज्या ठिकाणी खुनाची घटना घडलेली आहे, त्या इमारतीचे बांधकाम अजूनही सुरू आहे. या ठिकाणी जे मजूर कामावर होते, ते रोजंदारी पद्धतीवर कामाला होते, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या इमारतीचे कंत्राटदार, खुनाची घटना घडली त्यावेळी उपस्थित असलेल्या एका कामगाराला पणजी पोलिस ठाण्यात आणून जबान्या घेतल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी पथक नेमून संशयिताचा शोध घेणे सुरू केले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन संशयिताला शोधण्याचे प्रयत्न चालवले असून, पणजीतील कदंब बसस्थानकावरही संशयिताचा शोध घेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत संशयिताच्या मागावर पोलिस होते. या प्रकरणाचा पुढील तपास पणजी पोलिस करीत आहेत.









