मोटारसायकलवरून आलेल्यांकडून तीक्ष्ण हत्याराने वार
बेळगाव : कर्ले (ता. बेळगाव) येथील एका माजी ग्राम पंचायत सदस्याचा भीषण खून करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी बहाद्दरवाडी-कर्ले रोडवर गावापासून जवळच ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मोहन गिड्डू तळवार (वय 52) रा. कर्ले असे त्याचे नाव आहे. सोमवार दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मोहन आपल्या घराबाहेर पडला होता. 3 वाजता गावापासून जवळच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हा प्रकार पाहून गंभीर जखमी अवस्थेत त्याला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. सिव्हिलला हलवण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे प्रभारी पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. उपलब्ध माहितीनुसार मोहन तळवार हा माजी ग्राम पंचायत सदस्य होता. मोटारसायकलवरून आलेल्या दोघा जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. मारेकरी कोण, कोणत्या कारणासाठी सणादिवशीच त्याचा खून झाला? याचा उलगडा झाला नाही. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









