कोल्हापूर :
सोनळी (ता. कागल) येथील वरद रविंद्र पाटील (वय 7) या बालकाचे अपहरण करुन खून केल्याप्रकरणी आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांनी मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय 46 रा. सोनाळी ता. कागल) असे आरोपीचे नांव आहे. साडेतीन वर्षामध्ये जलदगतीने या संवेदनशील खून खटल्याचा निकाल लागला. याबाबतची फिर्याद रविंद्र गणपती पाटील (वय 35 रा. सोनाळी ता. कागल) यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात दिली होती. सरकारी वकील म्हणून जिल्हा सरकारी वकील अॅङ विवेक शुक्ल यांनी युक्तिवाद केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत वरद पाटील याचे वडील रविंद्र व आरोपी दत्तात्रय हे मित्र असून ते सोनाळी गावामध्ये राहण्यास होते. 17 ऑगस्ट 2021 रोजी रविंद्र पाटील यांच्या मेव्हुण्याच्या नवीन घराची वास्तुकशांती असल्यामुळे त्यांनी पत्नी व वरद पाटील यास सावर्डे बुद्रुक या गावी सोडले. सायंकाळी आपण कार्यक्रमास येतो असे सांगून रविंद्र पाटील सोनाळी गावी परतले होते. त्याच दिवशी रात्री रविंद्र पाटील आरोपी दत्तात्रय वैद्य हे दुचाकीवरुन सावर्डे बुद्रुक गावी वास्तुक शांतीसाठीच्या कार्यक्रमासाठी आले. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वरद मिळून येत नसल्याने त्याचा शोधाशोध सुरु करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत वरद न मिळाल्याने रविंद्र पाटील यांनी वरदच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत असताना वरद दत्तात्रय वैद्य याच्यासोबत दिसल्याची माहिती समोर आली. यानुसार पोलिसांनी दत्तात्रय वैद्य याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने वरदच्या खुनाची कबुली दिली. तसेच वरदचा मृतदेह सावर्डे गावापासून नजीकच्या खुळा पिंपळ नावाच्या शेतातील झुडपामध्ये टाकल्याचे कबूली दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहिले असता वरदचा मृतदेह झुडपामध्ये दिसून आला. त्याचा गळा आवळून निर्घुण खून करण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर मुरगुड पोलिसांनी दत्तात्रय वैद्य यास अटक केली. दरम्यान चिमुरड्या वरदच्या खूनाच्या घटनेमुळे जिह्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या घटनेचा तपास जलदगतीने करुन तात्काळ दोषारोपपत्र दाखल करण्याच्या सुचना दिल्या होत्या. यानुसार निवृत्त पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी या घटनेचा तपास केला. यानंतर तत्कालीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी 80 दिवसांमध्ये न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सरकारी वकील अॅङ विवेक शुक्ल यांनी केलेला युक्तीवाद आणि बाल साक्षीदार सुहासिनी लोहार, दक्ष माने यांच्यासह परिस्थीतीजन्य पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने दत्तात्रय वैद्य यास वरदचे अपहरण करणे, खून करणे, पुरावे नष्ट करणे यामध्ये दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
- पाळत ठेवून खून
वैद्य याने वरद पाटील याच्यावर पाळत ठेवूनच खून केल्याची माहिती तपासात समोर आली. वरद पाटील आणि आरोपी दत्तात्रय वैद्य हे एकाचवेळी जेवणाच्या पंगतीमध्ये बसले होते. मात्र वरद हळूहळू जेवण करत होता. यामुळे त्याला जेवणासाठी वेळ लागला. दत्तात्रय पाटील याने जेवण झाल्यानंतर पुढच्या पंगतीला पत्रावळ्या वाटण्याचे नाटक केले. वरद जेवून बाहेर पडल्यानंतर एक पत्रावळी फाटली असल्याचा कांगावा करुन दत्तात्रय वैद्यही तेथून बाहेर पडला.
- पाणटपरीवर बडीशेप, गोळी देण्याचा बहाणा
जेवण आटोपून वरद खेळण्यासाठी दारात आला होता. याचवेळी दत्तात्रय वैद्य वरदच्या मागोमाग बाहेर पडला. वरदला पाणटपरीवर बडीशोप आणि गोळी देण्याच्या बहाण्याने वरदला पाणटपरीवर नेले. यानंतरच दत्तात्रय वैद्य याने वरदचा शेतवडीमध्ये खून केला.
- खून करुन भजनाचा बनाव
वरदचा शोध घेत असताना दत्तात्रय वैद्य हा त्याच्या वडीलांना दत्त मंदिराजवळ मिळून आला. यावेळी रविंद्र पाटील यांनी विचारले असता आपण भजनामध्ये थांबल्याची माहिती दत्तात्रय वैद्य याने दिली होती. मात्र पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केली असता, वैद्य भजनात नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर दत्तात्रय वैद्य याच्यावरील संशय आणखीनच बळावला.
- नरबळीचा बनाव
वरदच्या मृतदेहावर पोलिसांना गुलाल, कुंकू आढळून आले होते. तसेच त्याच्या मृतदेहाशेजारी लिंबू टाकण्यात आले होते. त्याचे चप्पलही गायब केले होते. यावरुन हा नरबळीचा प्रकार भासविण्याचा प्रयत्न दत्तात्रय वैद्य याने केला होता.








