सातारा प्रतिनिधी
जांब ता. कोरेगाव पुर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात ऋषीकेश या मुलावर तलवारीने वार करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आरोपी रविंद्र निकम यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल होवून मा. न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्याचा निकाल लागला असून आरोपी रविंद्र याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
जांब ता.कोरेगांव येथील आबा जयसिंग निकम यांचा मुलगा व त्याचे चुलते जितेंद्र जयसिंग निकम हे आरोपी रविंद्र निकम याचे घरी त्यांच्यामध्ये असलेला पुर्वीचा वाद, भांडण मिटविण्यासाठी तंटा मुक्ती समितीपुढे यावे हा निरोप देण्यास गेले असता, आरोपी रविंद्र याने त्याचे घरातील लोकांसह ऋषीकेश यावर तलवारीने हल्ला चढवला. तलवारीने पोटात वार केल्याने ऋषीकेश हा उपचारादरम्यान गतप्राण झाला. या हत्या प्रकरणी सह आरोपी सोहील निकम व सचिन निकम यांच्यावरही संशय व्यक्त केला होता. या घटनेची नोंद कोरेगांव पोलीस स्टेशनमध्ये होउन त्यासंबंधिचे पुरावे पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सादर केले होते. या खून प्रकरणी ऍड विकास बा. पाटील- शिरगांवकर यांनी हे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहीले.









