शिरवळ :
शिरवळ पोलीस स्टेशन (जि. सातारा) यांच्या सतर्कतेमुळे बंगळूर (कर्नाटक) येथून पत्नीचा खून करून तिला बॅगेत भरून घराला कुलूप लावून मुंबईकडे पळून जाणाऱ्या आरोपीला त्याच्या वाहनासह पकडण्यात आले. त्यामुळे बंगळूरमध्ये झालेल्या खुनाचा तत्काळ उलगडा होण्यास मदत झाली.
याबाबत शिरवळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राकेश राजेंद्र खेडेकर (वय 35, नोकरी, रा. जोगेश्वरी, मुंबई) हा मुंबईहून बंगळूर येथे 25 फेब्रुवारी रोजी त्याची पत्नी गौरी खेडेकर (वय 32) हिच्यासह बनारघट्टा, तेजस्विनीनगर, बंगळूर येथे राहायला आला. राकेश ‘वर्क फ्रॉम होम’ करत होता, तर त्याची पत्नी गौरी नोकरी शोधत होती. 26 मार्च 2025 रोजी रात्री राकेशच्या पत्नीने मुंबईला परत जाण्याचा हट्ट धरला. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नी गौरीने घरातील भांडी आपटायला सुरुवात केली. दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने अखेरीस पत्नी गौरीने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे रागाच्या भरात राकेशने तिच्या हातातील चाकू घेऊन पत्नी गौरीच्या मानेवर, गळ्यावर आणि पाठीवर वार केले. गौरी जखमी होऊन घराच्या लॉबीत कोसळली आणि राकेशने ती मरण पावली असल्याची खात्री केली.
त्यानंतर राकेशने घरातील मोठी बॅग रिकामी करून त्यात पत्नी गौरीचा मृतदेह ठेवला आणि बॅगची चेन लावली. ती बॅग त्याने घराच्या बाथरूमबाहेर ठेवली. 27 मार्च रोजी रात्री 12:00 वाजता राकेश त्याचे सामान घेऊन त्याच्या मालकीच्या होंडा सिटी कारने जोगेश्वरी, मुंबईला जाण्यासाठी बंगळूरहून निघाला. पत्नीचा खून केल्यामुळे राकेश तणावात होता. त्याने महाराष्ट्रातील कागल येथे एका मेडिकल दुकानातून हार्पिक, सॅनिटायझर आणि झुरळ मारण्याचे औषध घेतले. कोल्हापूर–कराड येथे प्रवास करत असताना राकेशने त्याच्या बंगळूर येथील इमारतीतील खालच्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून पत्नीच्या खुनाची आणि मृतदेह बॅगेत ठेवल्याची माहिती दिली.
खंडाळा घाट उतरल्यानंतर शिरवळ येथील निप्रो कंपनीजवळ हायवे रोडवर राकेश गाडी घेऊन आला. खुनाच्या तणावामुळे त्याने विकत घेतलेले सर्व किटकनाशके आणि औषधे एकत्र करून पिली. त्यामुळे त्याला त्रास होऊ लागला आणि तो गाडीतून बाहेर येऊन रस्त्यावर बसला. राकेशला पाहून एका दुचाकीस्वाराने त्याची चौकशी केली असता त्याने सॅनिटायझर पिल्याचे सांगितले. त्यामुळे दुचाकीस्वाराने त्याला तातडीने त्याच्या गाडीतून शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले.
- पोलीस हवालदार कुंभार यांची समयसूचकता… आणि खुनाचा झाला उलगडा
याबाबत जोगळेकर हॉस्पिटलमधील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शिरवळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कुंभार यांनी राकेशला काय झाले अशी विचारणा केली असता राकेशने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु कुंभार यांनी प्रश्नांचा मारा केला असता राकेशने पत्नीच्या खुनाची माहिती कुंभार यांना दिली. बंगळूरमध्ये झालेल्या खुनाचा उलगडा शिरवळमध्ये झाल्याने हवालदार कुंभार यांच्या समयसूचकतेचे कौतुक होत आहे.
त्यानंतर याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी जोगळेकर हॉस्पिटलमधून आवश्यक माहिती घेऊन सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना माहिती दिली. पोलीस अधीक्षकांनी तातडीने बंगळूर येथे संपर्क साधून गौरीच्या खुनाची खात्री केली. तसेच, तेथील संबंधित वरिष्ठ अधिकारी, पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि इतरांचे फोन नंबर पोलीस निरीक्षक नलावडे यांना दिले आणि पुढील तपासासाठी सूचना दिल्या.
सातारा अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करून राकेशचे नातेवाईक आणि बंगळूर येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आरोपी आणि उपचारांची माहिती दिली. राकेशला अधिक उपचारांची गरज असल्याने पोलिसांनी त्याला तातडीने भारती विद्यापीठ हॉस्पिटल आणि त्यानंतर ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी दाखल केले. बंगळूर येथील संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी ससून हॉस्पिटलमध्ये पोहोचले असून त्यांनी आरोपीची चौकशी सुरू केली आहे.
आरोपी पळून जाण्याचा आणि विषारी किटकनाशके पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, नागरिक आणि पोलिसांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील उपचारांसाठी पुणे येथे पाठवले.
शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलीस हवालदार कुंभार, नितीन नलावडे, प्रशांत धुमाळ, सुनील मोहरे, पोलीस शिपाई दीपक पालेपवाड आणि होमगार्ड यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला.








