कोल्हापूर :
कर्ज मंजूर करण्यासाठी घेतलेले 65 हजार रुपये परत न देता कंर्ज ही मंजूर करुन दिले नसल्याच्या रागातून पाच जणांनी एकास बेदम मारहाण करुन खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पोलीस तपासात उघडकीस आली. याप्रकरणी करवीर पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, अन्य दोघांचा शोध सुरु आहे. प्रकाश जयवंत दळवी (वय 45, रा. सासनेनगर, आयटीआय हॉस्टेलमागे, कोल्हापूर) असे मृताचे नांव आहे. प्रकाश दळवी यास बुधवारी रात्री मारहाण करत अपहरण करुन, रात्रभर एका खोलीत कोंडून घालून गुरुवारी रात्री रस्त्याकडेला फेकून दिले होते.
या प्रकरणी पोलिसांनी सचिन भीमराव घाटगे (वय 32), बंडू उर्फ रोहित रामचंद्र कांबळे (28) आणि योगेश गुंडा खोंद्रे (31, तिघे रा. शिरोली दुमाला, ता. करवीर) यांना मंगळवारी (दि. 8) अटक करण्यात आली आहे. या तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 11 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर अजिंक्य शिवाजी शहापुरे (रा. आर. के नगर) आणि ओंकार अनिल पाटील (रा. शिरोली दुमाला) यांचा शोध सुरू असल्याची माहिती करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारा प्रकाश दळवी दोन दिवसांपासून बेपत्ता होता. गुरुवारी (2 एप्रिल) रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास क्रांतीसिंह नाना पाटील नगरातील एका फुटपाथवर तो बेशुद्धावस्थेत मिळून आला होता. करवीर पोलिसांनी त्याला सिपीआर रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. दळवी याचा मोबाईल आणि दुचाकी गायब असल्याने त्याचा मृत्यू झाला की खून याचा तपास करवीर पोलीस करत होते. यावेळी प्रकाश दळवी याची दोघांबरोबर वादावादी झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यानुसार तपास केला असता, प्रकाश दळवी याने सचिन घाटगे याला व्यवसायासाठी कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी प्रोसेस फी म्हणून वेळोवेळी 65 हजार रुपये ऑनलाईन घेतले होते. मात्र, कर्ज मिळवून दिले नाही. दळवी हा जरगनगर येथील एका बिअर बारमध्ये दारू पित बसल्याची माहिती मिळताच सचिन घाटगे आणि अजिंक्य शहापुरे हे दोघे बुधवारी (दि. 2) रात्री त्याला भेटायला गेले. कर्जाबद्दल विचारणा केल्यानंतर त्याने कर्ज आणि त्यासाठी घेतलेले पैसेही देणार नसल्याचे सांगितले. यावरून वाद वाढला. दोघे त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पुईखडी येथे घेऊन गेले. तिथे बंडू कांबळे, योगेश खोंद्रे आणि ओंकार पाटील या तिघांना बोलवून घेतले. पाच जणांनी त्याला लाथाबुक्क्या आणि कोल्हापुरी पायताणाने बेदम मारहाण केली. पोलिसात तक्रार करेल या भीतीने रात्री उशिरा त्याला शिरोली दुमाला येथील पठार नवाच्या शेतात एका खोपित डांबून ठेवले. गुरुवारी दुपारी त्याला वाशी नाका येथे आणून सोडले. याच परिसरात रात्री आठच्या सुमारास तो मृतावस्थेत आढळला होता.
पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाथ ा गळवे, रणजीत पाटील, विजय तळसकर, सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, राहुल देसाई, अशोक नंदे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव, विजय पाटील, अमोल चव्हाण यांनी हा तपास केला.
- खबऱ्यांच्या नेटवर्कवरुन तपास
प्रकाश दळवी याचा आकस्मिक मृत्यू अशी नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली होती. मात्र त्याच्या शरीरावरील जखमांचे व्रण पाहून त्याचा खून झाला असावा अशी शंका करवीर पोलिसांना आली. या दृष्टीने तपास करत असताना जरगनगर येथील एका बारमध्ये बुधवारी रात्री दळवी याचा दोघांशी वाद झाल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, संशयितांचा शोध लागला. ताब्यात घेऊन चौकशी करताच त्यांनी गुह्याची कबुली दिली.
- शेतात घेतला आश्रय
प्रकाश दळवी याला मारहाण केल्यानंतर जखमी अवस्थेततच त्याला नाना पाटील नगर येथील फुटपाथवर फेकून देण्यात आले होते. यानंतर दळवी याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पाचही संशयीत पसार झाले. यापैकी सचिन, रोहित, ओंकार हे तिघे गावानजीक असणाऱ्या एका शेतामध्ये लपून बसले होते. मोबाईल सुरु ठेवून ते गावातील मित्रांकडून गावातील हालचालींचा अंदाज घेत होते.








