पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांचा चाणाक्षपणा : संपूर्ण कुटुंबाकडूनच दिशाभूल करण्याचा प्रयत्न
बेळगाव : तपास अधिकाऱ्यांनी एखाद्या प्रकरणाच्या तपासात चाणाक्षपणा दाखवला नाहीतर तपासाची दिशाच बदलते. होत्याचे नव्हते होते. खरे गुन्हेगार मोकाट सुटतात. जर चाणाक्षपणाने एखाद्या गुन्ह्याचा माग काढण्याचे ठरविल्यास भल्याभल्या गुन्हेगारांनाही घाम सुटतो. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या चाणाक्षपणामुळे कुरणी (ता. हुक्केरी) येथे झालेल्या एका खून प्रकरणाचा केवळ सहा तासांत छडा लागला आहे.
संजू ऊर्फ पिंटू महादेव पाटील (वय 31) राहणार कुरणी याला गंभीर जखमी अवस्थेत संकेश्वर येथील सरकारी इस्पितळात नेताना वाटेतच मृत्यू झाला. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली होती. त्याच्या कुटुंबीयांनी ऊस तोडताना विळा लागून संजू जखमी झाला होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सुरुवातीला त्यांच्यावर विश्वास बसला. जावेद मुशापुरी यांनी संकेश्वर येथील सरकारी इस्पितळाला भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. त्याच्या उजव्या हाताला जखम झाली होती.
ऊस तोडताना संजू ऊर्फ पिंटू जखमी झाला असेल, उजव्या हातावर जखम कशी झाली? असा प्रश्न उपस्थित झाला. हा ऊस तोडताना विळा लागून झालेला मृत्यू नाही. खुनाचा हा प्रकार आहे, असा संशय बळावताच त्यांनी चौकशीला सुरुवात केली. केवळ सहा तासांत दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. खून झालेल्या संजू ऊर्फ पिंटू पाटीलचा भाऊ राकेश महादेव पाटील (वय 29) याने आपल्याच नात्यातील केंचाप्पा हुल्याप्पा पाटील (वय 21) याच्या मदतीने विळ्याने वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे राकेश व केंचाप्पा यांना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबच ऊस तोडताना विळा लागून संजूचा मृत्यू झाल्याचे सांगत होते. पोलिसांनी खुनाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता, दोन वर्षांपूर्वी संजू व राकेश या भावंडात राकेशच्या लग्नाच्या मुद्द्यावरून भांडण झाले होते. या भांडणानंतर संजूने आपले आईवडील व भावाला घराबाहेर काढले होते. मालमत्ताही स्वत:जवळच ठेवली होती. याच कारणावरून 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता भावंडांमध्ये भांडण झाले. राकेशने केंचाप्पाच्या मदतीने विळ्याने छातीवर वार करून त्याचा खून केला आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामगोंडा बसरगी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.
उजव्या हातावरील जखमेमुळे प्रकरणाचा उलगडा
संजू ऊर्फ पिंटूचा मृतदेह संकेश्वर येथील सरकारी इस्पितळात होता. त्यावेळी जावेद मुशापुरी यांनी इस्पितळाला भेट देऊन मृतदेहावर झालेल्या जखमांची माहिती घेतली. संजूच्या डाव्या छातीवर, हनुवटीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या होत्या. उजव्या हातावरील जखमेमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. ऊस तोडताना तो जखमी झाला असेल तर उजव्या हातावरील जखम कशामुळे झाली? या एका प्रश्नाचे उत्तर शोधताना खून प्रकरणाचा छडा लागला.









