कोल्हापूर :
पार्टीच्या निमीत्ताने मित्राला मानोली (ता. शाहूवाडी) येथे नेऊन त्याचा खून करणाऱ्या चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 3 एस. एस. तांबे यांनी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 21 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी मानोली (ता. शाहूवाडी) येथे ही घटना घडली होती. मृत संतोष मोहन तडाके (वय 30, रा. इचलकरंजी) याच्यावर कोयता, चाकूने वार करुन त्याचा खून करून मृतदेह विशाळगडनजीकच्या कोकण दर्शन पॉईंटवरून दरीत फेकून देण्यात आला होता.
अमीर उर्फ कांचा अब्बास मुल्ला (वय 27), सुनील बाळू खोत (38), सिद्धराम उर्फ सिद्धार्थ शांताप्पा म्हेतर (30, सर्व रा. लिंबू चौक, इचलकरंजी) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या गुह्यातील संजय शरद शेडगे याचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला आहे. सरकारी वकील म्हणून अॅङ मंजूषा पाटील यांनी काम पाहिले.
अधिक माहिती अशी, संतोष तडाके व संजय शेडगे हे दोघे मावस भाऊ होते. संतोष हा आपल्याला वरचढ होत असल्याची भावना संजयच्या मनात होती. यातून संजयने अमिर, सुनिल, सिद्धराम यांच्या मदतीने संतोष तडाकेचा काटा काढण्याचा कट रचला. 21 सप्टेंबर 2019 रोजी या चौघांनी विशाळगड येथे पार्टी करण्याच्या बहाण्याने संतोषला बोलावून घेतले. संजय शेडगे याने मित्र राकेश जाधव याला फोनकरुन त्याची मोटार लिंबू चौकात आणून देण्यास सांगितले. यानुसार राकेशने मोटार आणून दिली. यानंतर आरोपी अमीर मुल्ला, सुनील खोत, सिद्धराम म्हेतर यांच्यासोबत पाच जण चारचाकीतून विशाळगडला रवाना झाले. इचलकरंजी येथून वाठार वारणानगर मार्गे ते मलकापूरात पोहोचले. यानंतर आंबा– मानोलीमार्गे सर्वजण कोकणदर्शन पॉईंटला आले. या ठिकाणी पाचही जण मद्यप्राशन करत बसले होते. संतोष तडाके बेसावध असताना सिद्धराम म्हेतर याने पाठीमागून संतोषच्या डोक्यात कोयत्याने वार केला, तर संजय शेडगे याने संतोषचा चाकूने गळा चिरला. यानंतर हा गुन्हा लपविण्यासाठॅ कोकण दर्शन पाईंटजवळच त्याचा मृतदेह दरीत फेकला. यानंतर हे चौघे इचलकरंजीकडे रवाना झाले. त्यांनी वाटेत शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीमध्ये रक्ताने माखलेले स्वत:चे कपडे फेकले होते.
खून करुन तो पचविण्याचे पुर्ण नियोजन चारही आरोपींनी केले होते. मात्र मानोली भागात टुरीस्ट गाईड म्हणून काम करणारे दिनेश कांबळे यांना कोकण दर्शन पॉईंटजवळील फरशीवर रक्त सांडलेले दिसले होते. त्यांनी याचा व्हिडीओ करुन याची माहिती पोलिस पाटील दत्तात्रय गोमाडे (वय 59, रा. मानोली, शाहूवाडी) यांना दिली. याबाबत गोमाडे यांनी दिलेल्या माहिती आधारे शोध घेतला असता दरीमध्ये संतोष तडाकेचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन चौघांना अटक करण्यात आली होती.
खूनाचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर चालविण्यात आला. सरकार पक्षाच्या वतीन अॅड. मंजुषा पाटील यांनी 17 साक्षीदार तपासले. दरम्यान मुख्य आरोपी संजय शेडगे यांचा मृत्यू झाल्याने इतर तिघांविरोधात खटला सुरू होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही अॅड. पाटील यांनी केलेला युक्तीवाद आणि घेतलेल्या साक्षी उच्च, सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य धरून न्यायालयान तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तपास अधिकारी भालचंद्र देशमुख, पैरवी अधिकारी सीमा अष्टेकर यांचे सरकारी पक्षाला सहकार्य लाभले.








