प्रतिनिधी/ बेळगाव
मावस बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिल्याच्या रागातून एकाचा खून केलेल्या आरोपीला दहावे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने शनिवार दि. 3 रोजी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. परशराम निंगाप्पा काळे, राहणार मुळमुत्तल, ता. जि. धारवाड असे त्याचे नाव आहे.
बसवराज यल्लाप्पा काळी, राहणार मुगळीहाळ, ता. यरगट्टी याचा खून केल्याचा आरोप परशरामवर होता. मयत बसवराज हा डिसेंबर 2022 मध्ये धारवाड जिल्ह्यातील चिक्कमलिकवाड येथील आपल्या मावशीकडे अय्यप्पा स्वामी पूजेसाठी गेला होता. त्यानंतर तो त्यांच्या घरी काही दिवस राहिला. त्यावेळी त्याने मावस बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकात बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली.
काही दिवसांनंतर आरोपी जामिनावर कारागृहातून बाहेर आला. त्यामुळे पीडितेच्या दुसऱ्या मावशीचा मुलगा परशराम निंगाप्पा काळे हा बसवराजचा खून करण्याच्या उद्देशाने मुगळीहाळला गेला. त्या ठिकाणी त्याने बसवराजला आपल्या मोटारीवर बसवून घेतले आणि काही अंतरावर गेला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने आपल्याकडील चाकूने बसवराजवर सपासप वार करून त्याचा खून केला. याप्रकरणी परशरामच्या विरोधात मुरगोड पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. याबाबत न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आल्याने या खटल्याची सुनावणी दहावे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. त्या ठिकाणी आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकारी वकील म्हणून अॅड. आर. ए. बराबली यांनी काम पाहिले.









