वृत्तसंस्था/ निजामाबाद
तेलंगणातील निजामाबाद जिह्यातील पोलीस कॉन्स्टेबल ई. प्रमोद यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रॉडी शीटर शेख रियाज हा चकमकीत ठार झाला. तेलंगणा पोलिसांनी रविवारी जखमी अवस्थेत आरोपी रियाजला अटक केली होती. त्यानंतर सोमवारी पोलीस त्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात होते. या दरम्यान रियाजने पोलिसांच्या तावडीतून निसटण्यासाठी सोबत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून गोळीबार केला. याचदरम्यान अन्य पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात रियाज ठार झाला.
निजामाबादमधील पोलीस कॉन्स्टेबल ई. प्रमोद 17 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजता आरोपी रियाजला पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. याचदरम्यान विनायक नगर परिसरात रियाजने अचानक कॉन्स्टेबल प्रमोदवर तलवारीने हल्ला करत प्राणघातक वार केल्यामुळे कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला होता. रियाजच्या हल्ल्यात सहकारी कॉन्स्टेबल विठ्ठल हेदेखील जखमी झाले होते. कॉन्स्टेबल ई. प्रमोद यांना ठार मारल्यानंतर रियाज घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांनी जिह्यात नाकाबंदी लावून त्याचा शोध सुरू केल्यानंतर रविवारी रात्री त्याला अटक झाली. त्यानंतर सोमवारी दुपारी पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करताना रियाज चकमकीत मारला गेला.









