वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने नुकताच एक नवा निर्णय घेताना आपल्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरपदी मुरलीकृष्णन बी यांची नियुक्ती केली आहे. ते आता या कंपनीचे भारतीय व्यवसायाचे प्रमुख पद यापुढे सांभाळणार आहेत. सध्या त्यांची निवड केली असली तरी ते आपला पदभार 1 ऑगस्टपासून प्रत्यक्षात सांभाळणार असल्याची माहिती आहे.
शाओमीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे, की मुरलीकृष्णन बी हे शाओमीचे भारतामधील अध्यक्ष म्हणून दैनंदिन कामकाजाची जबाबदारी पाहणार आहेत. याशिवाय ते सेवा, सार्वजनिक व्यवहार आणि धोरणात्मक प्रकल्पही पाहणार असल्याची माहिती आहे. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत कंपनीला बळकटी प्राप्त करुन देण्यासाठी ते काम करणार असल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे. कंपनीला विकासाच्या मार्गावर ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत.
अल्प परिचय
मुरलीकृष्णन बी हे 2018 पासून कंपनीत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अर्थात सीओओ या पदावर काम करत होते. कोलकात्यातील आयआयएम संस्थेतून ते पदवीधर झाले असून कन्झुमर टेक क्षेत्राचा त्यांना 25 वर्षाचा गाढा अनुभव आहे. शाओमीच्या ऑफलाइन विक्री, सेवा व कारभारात त्यांनी जातीने लक्ष घातल्यानेच कंपनीने आपला विकास साधला आहे.









