वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविलेल्या मंगोलियाच्या नेमबाज मुन्खबायर दोर्सुरेन यांनी राष्ट्रीय पिस्तुल नेमबाजी संघाच्या प्रमुख विदेशी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. 9 जुलैपासून कोरियातील चांगवॉन येथे आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा होत असून त्याआधीच ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगोलियाच्या मुन्खबायर या अनुभवी माजी नेमबाज असून त्यांनी 1992 मधील बार्सिलोना व 2008 मधील बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 25 मी. पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदके मिळविली आहेत. याशिवाय त्यांनी राही सरनोबतलाही टेनिंग दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहीने 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. हा पराक्रम करणारी राही सरनोबत भारताची पहिली नेमबाज बनली होती.
त्यांचा अनुभव, त्यांची या खेळाची जाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उदयोन्मुख नेमबाजांसाठी त्या सर्वोत्तम मेंटर असल्याचे लक्षात घेऊन आम्ही त्यांची नियुक्ती केली आहे. पॅरिस ऑलिम्पिक लक्षात घेत आम्ही त्यांची दीर्घ काळासाठी नियुक्ती केली आहे, असे एनआरएआयचे सरचिटणीस कंवर सुलतान सिंग म्हणाले. 10 मी. व 25 मी. पिस्तुल नेमबाजीचे प्रमुख प्रशिक्षक समरेश जंग व रोनक पंडित यांच्यासमवेत त्या काम पाहणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.









