वृत्तसंस्था/ गुरुग्राम
हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाळ यांच्या निवासस्थानी ईडीने छाप्याची कारवाई केली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाकडून (डीआरआय) माहिती मिळाल्यावर ईडीने मुंजाळ यांच्यावर ही कारवाई केली आहे. डीआरआयने अलिकडेच मुंजाळ यांच्या एका निकटवर्तीयावर अघोषित विदेशी चलनाप्रकरणी कारवाई केली होती.
ईडीने मनी लॉन्ड्रिंग चौकशी अंतर्गत हीरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाळ आणि काही अन्य जणांच्या विरोधात छापे टाकले आहेत. पीएमएलएच्या तरतुदींनुसार दिल्ली आणि गुरुग्राम येथील ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. ईडीच्या कारवाईनंतर हीरो मोटोकॉर्पच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली आहे.
देशांतर्गत ऑटोमोबाइल कंपनी हीरो मोटोकॉर्प तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. कॉर्पोरेट विषयक मंत्रालयाने (एमसीए) कंपनीच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. हीरो मोटोकॉर्पच्या काही व्यवहारांप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मार्च 2022 मध्ये हीरो मोटोकॉर्पवर करचोरीचा आरोप झाला होता आणि याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. त्यादरम्यान प्राप्तिकर विभागाने पवन मुंजाळ यांच्या निवासस्थानाचीही झडती घेतली होती.









