सातारा :
सातारा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यावर ‘तरुण भारत’ने वारंवार प्रकाशझोत टाकला होता. त्याच अनुषंगाने पालिकेने डॉग कॅच मोहिम मंगळवारी सकाळपासून सुरु केली असून दोन तासात तब्बल 23 भटके कुत्रे पकडले असून त्यांची नसबंदी करण्यासाठी रवानगी पाचगणीला करण्यात आली आहे. दरम्यान, ही मोहिमेत आता सातत्य असणार आहे, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, डॉग कॅच करणाऱ्या ठेकेदाराची बदली करण्यात आली आहे.
सातारा शहरात दिवाळीच्यानंतर कुत्रे चावल्याच्या घटना शहरात अनेक घडल्या होत्या. तसेच त्यावेळी भटक्या बैलावरुनही प्रकरण गाजले होते. काही संघटनांनी आंदोलने केली होती. ‘तरुण भारत’च्यावतीने शहरातील भटक्या कुत्र्याच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला होता. पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सुचनेनुसार जुना ठेकेदार बदलून नव्या ठेकेदाराला काम दिले आहे. त्या ठेकेदाराने काम मिळताच लगेच कामाला सुरुवात केली आहे. सातारा पालिकेचे उपमुख्याधिकारी अरविंद दामले यांनी आरोग्य विभागाच्या सर्व निरीक्षकांची बैठक घेवून त्यांना डॉग कॅच मोहिम राबवण्याबाबत सुचित केले होते. त्यानुसार आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश राठोड, निरीक्षक सागर बडेकर यांनी खास डॉग कॅच मोहिमेकरता एका मुकादमाची नियुक्ती केली आहे. त्यानुसार मंगळवारी शहरात पोलीस हेडक्वॉटर मैदान, शुक्रवार पेठ केटेश्वर मंदिराच्या जवळ, राधिका टॉकीजजवळ, तोफखाना केसरकर पेठ, दुर्गापेठ आदी भागातील 23 भटकी कुत्री पडकली आहेत. त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येणार असून पुन्हा त्यांना सोडून देण्यात येणार आहे.
- डॉग कॅच मोहिमेतले कर्मचारी प्रशिक्षित
या राबवण्यात येत असलेल्या डॉग कॅच मोहिमेतले सर्व कर्मचारी हे प्रशिक्षित आहेत. त्यांना फोन केल्यानंतर ते त्याठिकाणी हे पथक पोहोचते आहे. त्या पथकाचे कर्मचारी त्या परिसरातील डॉग कॅच करतात.








