ड्रेनेज लाईन तुंबल्या : स्वच्छतेचे काम हाती
बेळगाव : पावसाला समाधानकारक सुरुवात झाल्याने गटारी, ड्रेनेज तुंबू लागल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज स्वच्छतेची मोहीम यशस्वी झाली नसल्याने पावसात तुंबलेली ड्रेनेज साफ करण्याची वेळ मनपावर आली आहे. त्यामुळे मनपाला उशिराने जाग आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत. शहरातील गटारी, नाले, ड्रेनेजची पावसाळ्यापूर्वी साफसफाई होणे आवश्यक होते. मात्र मनपाच्या दुर्लक्षपणामुळे पावसाळ्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबू लागल्याने परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. सोमवारी रिसालदार गल्ली येथील ड्रेनेजचे झाकण खोलून साफसफाईचे काम सुरू होते. मात्र ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक बाटल्या आणि कचरा साचून राहिल्याने कर्मचाऱ्यांची दमछाक झालेली पहायला मिळाली. शिवाय ड्रेनेज लाईनदेखील व्यवस्थित साफ झाली नाही. मनपाने पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन व्यवस्थित साफ केली असती तर पावसाळ्यात अडचण आली नसती. अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. ड्रेनेज लाईनच्या स्वच्छतेअभावी ठिकठिकाणी ड्रेनेज चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने ड्रेनेजची समस्या निर्माण झाली नव्हती. मात्र आता पावसाला जोर असल्याने ड्रेनेजची समस्या ऐरणीवर येऊ लागली आहे. शिवाय भर पावसात ड्रेनेज स्वच्छतेचे काम कर्मचाऱ्यांना हाती घ्यावे लागले आहे. या बेजबाबदार कामाबाबत स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.









