महापालिकेच्या बैठकीत निर्णय, महापौरांची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील कॅन्टीलिव्हर आणि गॅलरी जाहिरात फलकांचा प्रश्न शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत पुन्हा एकदा गाजला. गेल्या सहा महिन्यांपासून सदर जाहिरातींचा कब्जा महापालिकेने घ्यावा, अशी मागणी करून देखील अधिकारी कारवाई करण्यास चालढकल करत असल्याचा आरोप केल्याने अखेर 6 मे 2025 रोजी जाहिरातींचा ठेका संपताच कॅन्टीलिव्हर व गॅलरींचा ताबा महापालिकेने घ्यावा, अशी सूचना महापौर मंगेश पवार यांनी केली. तसेच सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली यांनी ठेकेदाराला काळ्यायादीत घालण्याची मागणी केली.
शहरात महापालिकेच्यावतीने गॅलरी आणि कॅन्टीलिव्हरचा ठेका एका ठेकेदाराला दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून सदर ठेकेदार वेगवेगळ्या फर्मच्या नावे ठेका घेत आहे. ठेकेदाराकडून महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्याचबरोबर ठेका संपून देखील ठेकेदाराकडून जाहिरात फलक लावण्यात येत आहेत. त्याच्याकडून संबंधित जाहिरातदाराकडून पैसेही वसूल केले जात आहेत. मात्र महापालिकेला या माध्यमातून कोणतेचे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कॅन्टीलिव्हर आणि गॅलरींचा ताबा घेण्यात यावा, अशी मागणी केली जात असली तरी त्याकडे दुर्लक्ष करत अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात आला. त्यावर तांत्रिक कारणामुळे सदर ठेकेदाराची मुदत 6 मे 2025 रोजी संपणार असल्याने तोपर्यंत काही करता येत नाही. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात आले. यावर कायदा सल्लागारांचा सल्ला विचारला असता न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारची स्थगिती नसल्याने गॅलरी आणि कॅन्टीलिव्हरचा ताबा घेता येऊ शकतो, असे सांगितले. हे प्रकरण सरकारकडे पाठविण्याऐवजी महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करून संपवावे, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर पोलिसात एफआयआर दाखल करण्यासह चौकशीसाठी लोकायुक्तांकडे प्रकरण वर्ग करण्याची मागणी करण्यात आली.
पुढील स्थायी बैठकीत बाय लॉ करणार…
जाहिरात ठेकेदाराकडून कर आकारण्यात येऊ नये, असा आदेश न्यायालयाचा असल्याने त्यांच्याकडून कर आकारणी करता येत नाही. त्याचबरोबर बेळगाव महापालिकेकडे बाय लॉ नसल्याने पुढील स्थायी बैठकीत बाय लॉ केला जाईल, तसेच संबंधिताकडून स्ट्रक्चर फी घेण्यात येईल, असेही महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी सांगितले. मात्र 6 मे रोजी ठेकेदाराचा ठेका संपणार असल्याने त्या दिवशी गॅलरी आणि कॅन्टीलिव्हरचा ताबा घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.









