विविध ठिकाणी क्रेन, लाईट अन् प्रेक्षक गॅलरीची सोय : महापालिका आयुक्तांची माहिती
बेळगाव : बेळगावची गणेशोत्सव मिरवणूक म्हणजे ऐतिहासिक मिरवणूक म्हणूनच पाहिली जाते. शहरामध्ये तब्बल 380 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी महापालिकेने 15 दिवसांपासूनच तयारी सुरू केली आहे. गुऊवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेने सर्व ती तयारी पूर्ण केली असून हे गणेश विसर्जन सुरळीत पार पडेल, असे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले आहे. कपिलेश्वर येथील मोठ्या विसर्जन तलावांजवळ चार क्रेन, लहान तलावाजवळ 3 क्रेन, जक्किनहोंडा तलावाजवळ 2, मजगाव तलावाजवळ 1, किल्ला तलाव येथे 1 आणि कणबर्गी तलाव येथे 1 अशा एकूण 12 क्रेन विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याचबरोबर तलाव तसेच मिरवणूक मार्गावर हॅलोजनची व्यवस्थाही केली आहे.
विसर्जन मार्गावरील धर्मवीर संभाजी चौक येथे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भक्तांना गॅलरीची सोय करण्यात आली आहे. याचबरोबर विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेल्या गटारींवर काँक्रिट तसेच फरशीदेखील बसविण्यात आली आहे. एकूणच संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. तलावाजवळ जलतरणपटूंची देखील नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती अशोक दुडगुंटी यांनी दिली आहे.
दुपारी मिरवणुकीला होणार सुऊवात
गुऊवारी दुपारी गणेशोत्सव मिरवणुकीला सुऊवात होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल. तलाव तसेच इतर परिसरात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातील कचरा तातडीने गोळा करण्यासाठी व उचल करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनाही तैनात करण्यात आले आहे. विसर्जन हे विविध तलावांवर होणार आहे. याचबरोबर घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी दोन फिरते कुंड ठेवण्यात आले आहेत. मात्र मागणीनुसारच त्यांना पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
श्री विसर्जन मिरवणूक मार्गावर पथसंचलन
श्री विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांनी पथसंचलन करत शक्तिप्रदर्शन केले. कायदा-सुव्यवस्था परिस्थितीला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पथसंचलन झाले. राणी कित्तूर चन्नम्मा चौकापासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी जलद कृती दलाची एक तुकडी व बंदोबस्तासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले अधिकारी व पोलीस यामध्ये सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावरून जाऊन कपिलेश्वर मंदिराजवळ पथसंचलनाची सांगता झाली. बंदोबस्तासाठी पोलीसप्रमुख दर्जाचे 5, 20 पोलीस उपअधीक्षक, 72 पोलीस निरीक्षक, 106 पोलीस उपनिरीक्षक, 210 साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 2048 हवालदार व पोलीस, 405 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या 10 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. याबरोबरच स्थानिक अधिकारी व पोलिसांवरही बंदोबस्ताची जबाबदारी आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागासह मिरवणूक मार्गावर 487 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. 8 ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. विघातक कृत्य तपासणीसाठी तीन पथके असणार आहेत. मिरवणुकीसाठी शहरातील वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले असून मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी नागरिकांनी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
विसर्जन मिरवणूक काळात शहरात वाहतूक व्यवस्थेत बदल
श्री विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते मिरवणूक संपेपर्यंत शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग ठरविण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. गुरुवारी दुपारी 2 पासून सम्राट अशोक चौक, आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कलमार्गे कॉलेज रोडवरून खानापूरला जाणारी वाहतूक संगोळ्ळी रायण्णा सर्कलपासून जुन्या पी. बी. रोडवरून कोल्हापूर सर्कल, वाय जंक्शन, सदाशिवनगर लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्यानगर, बाची क्रॉस, महात्मा गांधी सर्कल (अरगन तलाव), शौर्य चौक (मिलिटरी हॉस्पिटल), केंद्रीय विद्यालय क्र. 2, शरकत पार्क, ग्लोब थिएटर सर्कलमागे खानापूर रोडकडे वळविण्यात येणार आहेत.
जिजामाता सर्कलहून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक, कंबळी खूट, पिंपळकट्टा, पाटील गल्लीकडे जाणारी वाहने जिजामाता सर्कलहून मध्यवर्ती बसस्थानकाकडे वळविण्यात आली आहेत. खानापूरहून बेळगावला येणारी वाहतूक गोगटे सर्कलहून रेल्वेस्टेशन, पोस्ट ऑफिस सर्कल, शनिमंदिर मार्गे जाणारी वाहने ग्लोब थिएटर सर्कलजवळ डाव्या बाजूने वळविण्यात येणार आहेत. शरकत पार्क, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शौर्य चौक, महात्मा गांधी सर्कल, हिंडलगा गणेशमंदिर, बॉक्साईट रोडमार्गे राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात येणार आहेत.
नाथ पै सर्कलहून बँक ऑफ इंडिया, एसपीएम रोड मार्गे कपिलेश्वर उ•ाणपुलावरून जाणारी वाहने बँक ऑफ इंडियाजवळ वळविण्यात येणार असून जुन्या पी. बी. रोडवरून त्यांना जावे लागणार आहे. जुना पी. बी. रोड, व्हीआरएल लॉजिस्टिक, भातकांडे स्कूल मार्गे कपिलेश्वरकडे येणारी वाहने संभाजी रोडवरून बसवेश्वर सर्कलवरून खासबाग, नाथ पै सर्कलमार्गे वळविण्यात येणार आहेत. गुड्सशेड रोडवरून कपिलेश्वरकडे येणारी वाहतूक एसपीएम रोडवरून मराठा मंदिरजवळून गोवावेस सर्कलकडे वळविली जाणार आहेत. दि. 28 च्या दुपारी 2 पासून दुसऱ्या दिवशी 29 सप्टेंबरच्या सकाळी 10 पर्यंत बेळगाव शहरात सर्व भागातून येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश रोखण्यात येणार आहे. चन्नम्मा सर्कलहून काकतीवेस, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, कॉलेज रोड, ध. संभाजी चौकसह मिरवणूक मार्गावर व कॅम्प परिसरातील हॅवलॉक रोड, कॅटल रोड, यंदे खुटापासून देशपांडे खुटापर्यंत व पवन हॉटेलपर्यंत सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास निर्बंध असणार आहेत.









