नाले सफाईचे काम सुरू : पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले-गटारी स्वच्छ करण्याची मागणी : पावसामुळे नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी
बेळगाव : अवकाळी पावसामुळे सोमवारी शहर आणि उपनगरात अक्षरश: दाणादाण उडाली. गटारी आणि नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जिकडे तिकडे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे जागे झालेल्या महापालिकेने शहरातील नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले आहे. मंगळवारी शिवाजी रोडवरील नाल्याची सफाई करण्यात आली. मात्र, पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले आणि गटारींची सफाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढले. जवळपास तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अक्षरश: तारांबळ उडाली.
पावसाचे पाणी गटारीतून वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाल्याने केरकचरा व सांडपाणी रस्त्यावर आले. इतकेच नव्हे तर फोर्ट रोड आणि येडियुराप्पा रोडला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. कांदा मार्केटमधील भाजी विक्रेते गुडघाभर पाण्यात बसून व्यवसाय करत होते. यापूर्वी महापालिकेत झालेल्या आरोग्य तसेच बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत पावसाळ्यापूर्वी शहरातील लहान-मोठे नाले आणि गटारींची स्वच्छता करावी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली होती. मात्र 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर नाल्यांची स्वच्छता केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सांडपाणी लोकांच्या घरात शिरण्यासह रस्त्यावर पसरले. त्यामुळे जिकडे तिकडे दुर्गंधी पसरली आहे.
महापालिकेच्या या गलथान कारभाराबाबत बेळगावकरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खरे तर यापूर्वीच गटारी व नाल्यांची सफाई करणे जरुरीचे होते. मात्र सोमवारच्या अवकाळी पावसानंतर महापालिकेचे पितळ उघडे पडल्याने अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. प्रभाग क्र. 10 मध्ये येणाऱ्या शिवाजी रोडवरील नाल्यात केरकचरा व प्लास्टिक मोठ्या प्रमाणात तुंबून राहिल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे ही बाब नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार मंगळवारी स्वच्छता निरीक्षक आनंद पिंपळे यांनी जेसीबी लावून नाल्याची सफाई केली. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास मार्ग मोकळा झाला आहे. केवळ एकच नाल्याची सफाई न करता शहर व उपनगरातील अन्य नाल्यांची व गटारींची सफाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
बेनकनहळ्ळीनजीक ग्रा. पं. कडून स्वच्छता
सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागाला झोडपून काढले. त्यामुळे ठिकठिकाणी गटारीतील सांडपाणी मुख्य रस्त्यावरून वाहात होते. प्रामुख्याने बेळगाव-रामघाट रोडवरील क्रांतीनगर ते बेनकनहळ्ळी गावच्या नाल्यादरम्यानच्या रस्त्यावरून केरकचरा व प्लास्टिक वाहत होते. तसेच ते रस्त्याच्या मधोमध अडकून पडल्याने सांडपाण्यातूनच वाहनचालकांना वाट शोधावी लागली. बेनकनहळ्ळी ग्रा. पं. च्या या दुर्लक्षपणामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या चरीतील गाळ व केरकचरा जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छ करण्यात आला.









