नगरसेवकांचे मनपा आयुक्तांना निवेदन
बेळगाव : कोरोनाकाळात महानगरपालिकेची शववाहिका बिम्सला देण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर ती शववाहिका अजूनही बिम्सकडेच आहे. ती तशीच उभी असून खराब झाली आहे. तेव्हा तातडीने शववाहिकेची दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. त्यानंतर तातडीने आयुक्तांनी शववाहिका घेण्याबाबत हालचाली केल्या आहेत. कोरोनाकाळात 2020 मध्ये शववाहिका बिम्सकडे देण्यात आली होती. त्यामुळे महानगरपालिकेकडे शववाहिका कमी झाल्या होत्या. सध्या असलेल्या शववाहिका नादुरुस्त आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे शववाहिकांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तेव्हा तातडीने बिम्सकडील शववाहिका घ्यावी आणि दुरुस्त करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर आदी उपस्थित होते.









