गोडावूनमध्ये वाहने पार्किंग करण्याची मागणी
बेळगाव : सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये महापालिकेची वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेचे गोडावून त्या परिसरात आहे. गोडावूनमध्ये पार्किंग करण्याऐवजी स्मशानभूमीच्या जागेमध्येच ही वाहने पार्किंग केली जात आहेत. हे अत्यंत चुकीचे असून तातडीने तेथील वाहने हटवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. सदाशिवनगर येथे सार्वजनिक मोठी स्मशानभूमी आहे. त्यामध्ये महापालिकेबरोबरच अनेकांनी विविध विकासकामे राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. स्मशानसाठी शेड, शेगड्या याचबरोबर इतर सर्व व्यवस्था त्याठिकाणी उपलब्ध आहे. बरीच जागा खुली आहे. मात्र त्या जागेमध्ये मनपा कर्मचारी वाहने पार्किंग करत आहेत. कचऱ्याची व इतर वाहने पार्किंग केली जात आहेत. मनपा आयुक्तांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन वाहने हटवावीत, अशी मागणी होत आहे.









