अहिल्या परकाळे,कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी 2016 पासून राज्यात अव्वल ठरले आहेत.महापालिकेच्या शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टीकोन बदलला असून महापालिका शाळेच्या प्रवेशाचा टक्का वाढला आहे. दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत टीकाव लागत नाही.त्यामुळे प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी काही शाळांचे प्रवेश फुल्ल होतात.गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचेही राज्यभर कौतुक होत आहे.गेल्या सात वर्षापासून महापालिका प्राथमिक शाळा कृती समितीने शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात राबवलेल्या योजनांचा विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होतोय.विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूरचे नाव राज्यात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताना समानार्थी व विरोधाअर्थी शब्द, गणित व इंग्रजी प्रश्नांचा सराव शाळांमध्ये करून घेतला जातो. इतर पुस्तकांपेक्षा वेगवेगळया व नवनवीन शब्दांची ओळख ,प्रश्नपत्रिका सोडवण्याचा दररोजचा सराव करून घेतला जातो. महापालिका प्राथमिक शिक्षण समितीसह विविध शिक्षक संघटना शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेतात. विविध योजना राबववून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्तीही दिली जाते. तसेच राज्य किंवा जिल्हा गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून राज्य व जिल्हास्तरीयसह महापालिका वेगळे बक्षिस देते. तसेच महापालिकेकडून गुणवत्ता यादीतील 25 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. अलीकडे महापालिका प्राथमिक शिक्षण समितीकडून राबवल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षण योजनांमुळे अनेक शाळांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जरगनगर, टेंबलाईवाडीसह अन्य शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अव्वल येतात. स्पर्धा परीक्षेचा पाया असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्याकडे पालकांचा ओढा असल्याने महापालिकेच्या काही शाळांमधील प्रवेश पहिल्याच दिवशी फुल्ल होतात.
यंदाही महापालिका शाळेतील 61 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत. परिणामी शाळांबरोबर पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. शाळांकडून प्रत्येक आठवड्याला शिष्यवृत्तीशी मिळत्या-जुळत्या प्रश्नांचा सराव. शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताना पाठांतरासाठी सोप्या भाषेत प्रश्नोत्तरे दिली जातात. शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला सराव प्रश्नपत्रिका संच दिला जातो. प्रत्येक विषयाचे ग्रुप डिसकशन, वाचन, चिंतन, मनन करण्याची सवय शिक्षक विद्यार्थ्यांना लावत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाणे सहज शक्य असल्याच्या भावना विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.
राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची संख्या आणि अव्वल विद्यार्थ्याचे नाव
वर्ष राज्य जिल्हा विद्यार्थी नाव
2016-17 11 36 वर्धन माळी (राज्यात प्रथम )
2017-18 4 27 साईराज पाटील (राज्यात सातवा)
2018-19 10 33 पियुष कुंभार (राज्यात प्रथम)
2019-20 1 37 जान्हवी देसाई (राज्यात सोळावी)
2020-21 10 47 देवयाणी बेर्डे (राज्यात सहावी)
2021-22 13 61 अंजली पाटील (राज्यात चौथी)
या शाळा शिष्यवृत्तीत कायमच सरस
-टेंबलाईवाडी विद्यालय, टेंबलाईवाडी
-प्रिन्स शिवाजी विद्यालय, जाधववाडी
-लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालय, जरगनगर
-नेहरूनगर विद्यालय
-यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर
सर्वांगिण विकास उपक्रमाचा फायदा
महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. तर बौध्दीक विकासासाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, सांस्कृतिक, सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळा शिष्यवृत्तीच्या राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत दरवर्षी यश मिळवतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आयुक्त, उपायुक्त यांच्याकडूनही प्रोत्साहन मिळते.
शंकर यादव (प्रशासक, महापालिका प्राथमिक शिक्षण समिती)
Previous Articleकसबा, चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर
Next Article G-20 च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट









