शंभर किलो प्लास्टिक जप्त : दंडात्मक कारवाई
बेळगाव : सिंगल युज प्लास्टिकच्या विक्रीवर बंदी असतानादेखील बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांकडून अद्यापही खुलेआम प्लास्टिकची विक्री केली जात आहे. त्यामुळे सोमवारी मनपाच्या आरोग्य विभागाकडून रविवार पेठ आणि मेणसी गल्ली येथील एकूण तीन दुकानांवर छापेमारी करण्यात आली. छाप्यांदरम्यान शंभर किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे बेकायदा प्लास्टिक विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासह मानवी जीवनावर सिंगल युज प्लास्टिकच्या वापरामुळे परिणाम होत असल्याच्या कारणावरून प्लास्टिकची विक्री आणि वापरावर सरकारने बंदी घातली आहे. तरीदेखील अद्याप शहरात प्लास्टिकची विक्री व वापर सुरूच आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने प्लास्टिक विक्री दुकानांवर छापेमारी करून कारवाई केली जात आहे. तरीही प्लास्टिकची विक्री थांबलेली नाही.
रविवार पेठ आणि मेणसी गल्ली येथील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंगल युज प्लास्टिकचा साठा करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी आपल्या सहकाऱ्यांसह तिन्ही दुकानांवर छापेमारी केली. दुकानात झाडाझडती घेतली असता तिन्ही ठिकाणी शंभर किलोहून अधिक प्लास्टिक आढळून आले. त्यामुळे प्लास्टिक जप्त करण्यासह दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.









