कर वसुलीत कमतरता, विकासकामात अपयशी ठरल्याचा ठपका
बेळगाव : महानगरपालिकेने कर वाढवून कर जमा करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे महापालिकेचे सभागृह बरखास्त का करू नये, अशा आशयाची नोटीस राज्य नगरविकास खात्याकडून आयुक्त तसेच महापौरांना बजावण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत महापौरांकडून अशी नोटीस आली नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर कर जमा करण्याबरोबरच विविध विकासकामे राबविण्यामध्ये महापालिका अपयशी ठरली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या नोटिसीमुळे सत्ताधारी गटामध्ये खळबळ उडाली आहे. या नोटिसीबाबत विचारणा करण्यासाठी महापालिका आयुक्त यांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. महापालिकेची निवडणूक होऊन तब्बल दीड वर्षानंतर सभागृह अस्तित्वात आले. त्यानंतर सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन महापालिकेच्या सभागृहाने केले नाही. सध्या सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या बैठका झाल्या तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. करवसुलीमध्येही बेळगाव महानगरपालिका कमी पडली आहे. अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य नगरविकास खात्याकडून ही नोटीस आल्याचे समजते.









