कौन्सिल विभागाने सुरू केली तयारी : भू-भाड्यांच्या निविदेसह इतर समस्यांवर होणार चर्चा
बेळगाव : महानगरपालिकेची कौन्सिल बैठक शनिवार दि. 17 रोजी होणार आहे. त्या बैठकीची तयारी कौन्सिल विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. महानगरपालिकेचे सभागृह स्वच्छ करणे तसेच नगरसेवकांना नोटिसा देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या बैठकात भू-भाड्यांच्या निविदेसह इतर समस्यांवर चर्चा करण्यात होणार आहे. मात्र निधी वाटप आणि मागील स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महानगरपालिकेतील सत्ताधारी गटांने संपूर्ण निधी लाटला असल्याचा आरोप विरोधी गटाच्या नगरसेवकांनी केला आहे. त्याबाबत शुक्रवारी महापौरांच्या कक्षामध्ये बैठक पार पाडली होती. त्यामध्ये महापौर सविता कांबळे यांनी योग्य तो तोडगा काढू असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप तरी त्याबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याने होणाऱ्या बैठकीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थायी समितीच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या असून त्याला मंजुरी दिली गेली आहे. तर मागील स्थायी समितीच्या सदस्यांनी मंजूर केलेले काही ठराव रद्द केले आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटामध्येही वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभागृहात त्या विषयांवर चर्चा झाली तर आरोप प्रत्यारोप केले जाणार आहेत. विशेष करून विद्यार्थ्यांना देण्यात आलेले लॅपटॉप व तसेच इतर योजना एकाच परिसरातील जनतेला वितरित केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यावरही चर्चा रंगणार आहे. कौन्सिल विभागाने सर्वती तयारी केली आहे. विषय पत्रिकांवर काही मोजके विषयच घेण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयांवरच गरमागरम चर्चा होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. सभागृहाची व्यवस्था तसेच इतर इतिवृत्त व इतर कागदपत्रे नगरसेवकांना पोहोचविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.









