दुकान परवान्यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्री परवानाही आवश्यक, मनपात कार्यशाळा
बेळगाव : तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यासाठी आता महापालिकेकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार यापुढे परवाना दिला जाणार आहे. परवाना न घेता कोणीही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असतील तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महापालिकेमध्ये जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, जिल्हा तंबाखू नियंत्रण विभाग आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. यावेळी महापालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते राजशेखर डोणी, अॅड. हणमंत कोंगाली, नगरसेवक रवी साळुंखे, रेश्मा भैरकदार, श्रेयश नाकाडी आदी उपस्थित होते. प्रारंभी राज्य तंबाखू नियंत्रण विभागाचे कोऑर्डानेटर महांतेश बीयु यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.
नगरसेवक अॅड. हणमंत कोंगाली यांनी कोटपा कायद्यांतर्गत तंबाखू किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा गुन्हा आहे. याबाबत नियमावली ठरविण्यात आली आहे. आता तर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यासाठी महापालिकेकडून परवाना घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता विक्रीवर नियंत्रण मिळविता येणार आहे. जिल्हा तंबाखू नियंत्रण सर्वेक्षण अधिकारी डॉ. संजय दोडमनी यांनी तंबाखूमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागते. तेव्हा साऱ्यांनीच याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी कायद्याबाबतची माहिती दिली. विनापरवाना कोणीही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असेल तर त्यांच्यावर संयुक्तपणे कारवाई केली जाणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. महापालिका तसेच तंबाखू नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कशा प्रकारे कारवाई केली पाहिजेत, याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला राज्य तंबाखू नियंत्रण विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रभाकर यांच्यासह महापालिकेतील आरोग्य निरीक्षक, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









