पाच हजार रुपयांचा दंड : खाद्यपदार्थांत रंग तसेच अस्वच्छतेचे कारण
बेळगाव : खाद्यपदार्थांत रासायनिक रंग वापरण्यासह अस्वच्छता आढळून आल्याने कडोलकर गल्लीतील शांती ग्रँडसह दोन हॉटेलवर बुधवार दि. 5 रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर आणि उपनगरातील हॉटेल्सना महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे गेल्या काही दिवसांपासून अचानक भेट देऊन पाहणी करत आहेत. स्वयंपाक खोलीत अस्वच्छता ठेवण्यासह ग्राहकांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदाथर्मिंध्ये रासायनिक रंगाचा वापर करणे, त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर करणे आदींवर बंदी असतानाही बहुतांश हॉटेलचालकांकडून याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाकडून ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे. यापूर्वीदेखील शहरातील काही हॉटेल्सवर अचानक कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बुधवारी कडोलकर गल्लीतील शांती ग्रँडसह दोन हॉटेलवर आरोग्य विभागाच्यावतीने अचानक तपासणी करून कारवाई करण्यात आली. पाहणी दरम्यान हॉटेलमध्ये त्रुटी आढळून आल्याने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.









