500 किलो प्लास्टिक जप्त : 10 हजार रुपयांचा दंड
बेळगाव : सिंगल युज प्लास्टिकच्या विक्री आणि वापरावर बंदी असतानाही बाजारपेठेतील काही दुकानांत खुलेआम प्लास्टिकची विक्री केली जात आहे. त्यामुळे बुधवार दि. 28 रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्लास्टिकची विक्री करणाऱ्या बाजारपेठेतील तीन दुकानांवर कारवाई करत 500 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तसेच संबंधितांना 10 हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. सिंगल युज प्लास्टिकची विक्री तसेच वापर करण्यात येऊ नये, कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करण्यात यावा, असे आवाहन सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावतीने केले जात आहे. तरीदेखील प्लास्टिकचा वापर आणि विक्री अद्यापही थांबलेली नाही. प्लास्टिकमुळे प्रदुषणात वाढ होत असल्याने प्लास्टिकवर निर्बंध आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यासह वापर करण्यात येऊ नये, यासाठी जनजागृतीही केली जात आहे. तरीही प्लास्टिकची खुलेआम विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.
वारंवार कारवाई
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तसेच पर्यावरण अधिकाऱ्यांकडून बाजारपेठेतील प्लास्टिक विक्री दुकानांवर वारंवार कारवाई केली जात असली तरी अद्यापही प्लास्टिक विक्रीवर नियंत्रण आलेले नाही. बाजारपेठेतील तीन दुकानांवर बुधवारी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण अभियंता आदिल खान आणि प्रवीणकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.









