17 हजार रुपयांचा दंड वसूल
प्रतिनिधी/ बेळगाव
प्लास्टिकचा वापर करण्यासह व्यापार परवाना न घेणाऱ्या हॉटेल्सवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई सुरूच ठेवली आहे. शनिवार दि. 4 रोजी सांबरा रोडवरील काही हॉटेल्सवर आरोग्य निरीक्षक रुक्सार मुल्ला यांनी कारवाई करत 17 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या शहर आणि उपनगरातील विविध हॉटेल्स व व्यापारी आस्थापनांना महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून भेट देऊन पाहणी केली जात आहे. पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जात आहे. व्यवसाय सुरू करताना बहुतांश जणांनी महापालिकेकडून व्यापार परवाना न घेतल्याचेही दिसून येत आहे. कोणताही व्यवसाय सुरू करायचा असल्यास महानगरपालिकेकडून व्यापार परवाना घेणे जरुरीचे आहे. पण काही जणांकडून बेकायदेशीररीत्या व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. तसेच सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी असतानाही खुलेआम वापर केला जात आहे. त्यामुळे ही बाब महापालिकेच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने घेतली आहे. यापूर्वी अनेकवेळा ठिकठिकाणी तपासणी करून हॉटेल्समध्ये स्वच्छता न ठेवणे, व्यापार परवाना न घेणे, प्लास्टिकचा वापर करणे आदी प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स व व्यापारी आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शनिवारीही महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक रुक्सार मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांबरा रोडवरील काही हॉटेल्सवर कारवाई केली. कारवाई दरम्यान काही हॉटेल्स चालकांकडून मनपाचा व्यापार परवाना घेतला नसल्याचे दिसून आले. तर काही हॉटेल्समध्ये प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून आल्याने संबंधित हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई करत 17 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.









