शहरातील अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई : झेंडे-बॅनर वाहनधारकांनाही धोकादायक
बेळगाव : सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्याकरिता बैठका, सभा, समारंभ व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याकरिता सरकारमधील मंत्री महोदय शहरात दाखल होत असल्याने सर्वत्र पक्षांचे झेंडे आणि स्वागत कमानी तसेच बॅनरबाजी सुरू आहे. याची डोकेदुखी महापालिकेला झाली असून कार्यक्रम झाल्यानंतर लागलीच बॅनर हटविण्याची जबाबदारी महापालिकेवर पडत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच चौकात, दुभाजकांवर पक्षाचे झेंडे आणि बॅनर लावण्यासाठी कंत्राट दिले जाते. मात्र लागलीच काढले जात नसल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढत आहे. झेंडे व जाहिरात फलक हटविण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला धावपळ करावी लागत आहे. अलीकडेच विविध कार्यक्रम शहरात आयोजित करण्यात आले होते. त्याकरिता शक्तिप्रदर्शनासह राष्ट्रीय पक्षांचे ध्वज आणि बॅनर सर्वत्र लावण्यात आले होते. विविध चौकांतील बॅरिकेड्सना झेंडे बांधण्यात आले होते. सदर झेंडे किंवा जाहिरात फलकांबाबत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कायदा व सु-व्यवस्था बघडण्याची शक्यता आहे. याची दखल घेऊन शहरात लावण्यात आलेले जाहिरात फलक तसेच झेंडे हटविण्याची कारवाई महापालिकेकडून तातडीने केली जाते. काही ठिकाणी असलेले झेंडे तसेच बॅनर वाहनधारकांनाही धोकादायक बनलेले असतात.
गेल्या दोन दिवसांपासून मनपाच्या पथकाकडून कारवाई सुरू
वाऱ्यामुळे वाहनधारकांच्या अंगावर कोसळण्याचा धोका असतो. तसेच हे फलक लावण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली जात नाही. तर काहीवेळा मोजकेच फलक लावण्यासाठी परवानगी घेऊन शेकडो फलक लावले जातात. त्यामुळे मनपाकडून अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मनपाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारीही विविध मार्गांवरील ध्वज व जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली.









