न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
वाढत्या दबावतंत्राच्या विरोधात महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी शनिवारी हाताच्या दंडाला काळ्या फिती बांधून कार्यालयीन कामकाज केले. त्यातच महापौर-उपमहापौर निवडणुकीमुळे महापालिकेत मोठी गर्दी होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या निषेध आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नगरसेवक, तसेच लोकांकडून दबावतंत्र वाढत चालले आहे. इतकेच नव्हे तर आता थेट जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेकायदा कामे करून देण्यास नकार दिल्याने अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धमकाविले जात आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे कर्मचारी धास्तावले असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मात्र तशातच कर्मचारी आपले दैनंदिन कामकाज करत आहेत. तर धमकी सत्रांमध्ये वाढ झाल्याने दोन दिवसांपूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व विभागांचे काम बंद ठेवून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी राज्य सरकारचे अधिवेशन संपेपर्यंत सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आल्याने तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र आपला निषेध नोंदविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी आपल्या हाताच्या दंडांना काळ्या फिती बांधून कार्यालयीन कामकाज केले.
महापौर-उपमहापौर निवडणुकीमुळे मनपा कार्यालयात नागरिकांची मोठी वर्दळ होती. मात्र कर्मचाऱ्यांनी हाताच्या दंडांना काळ्या फिती बांधून काम केल्याने महापालिकेत चर्चेचा विषय बनला होता. अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा आंदोलन छेडले जाणार असून दादागिरी करणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.









