नाथ पै सर्कल ते खासबागपर्यंतच्या गटारीच्या कामाचा दर्जा उघडकीस
बेळगाव : नाथ पै सर्कलपासून खासबागकडे बांधण्यात आलेल्या गटारींचा दर्जा निकृष्ट तसेच नियोजन नसल्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे तातडीने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून शुक्रवारी सकाळी गटारी साफ करण्यात आल्या आहेत. मात्र या गटारी साफ करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कर्मचारीही अक्षरश: वैतागले आहेत. वॉर्ड क्र. 27 मध्ये येणाऱ्या या गटारींची समस्या नगरसेवक रवी साळुंखे यांनी अनेकवेळा सर्वसाधारण सभेमध्ये मांडली. मात्र कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी रवी साळुंखे यांनाच विरोध केला. मात्र आता पावसामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. गटारीची रुंदी केवळ 1 फूट आहे. मात्र ती 4 फूट असल्याचे दाखविण्यात आले आहे. असा आरोपही रवी साळुंखे यांनी केला आहे.
काम अर्धवट असतानाच महानगरपालिकेकडे हस्तांतर
स्मार्ट सिटी अंतर्गत हे काम करण्यात आले आहे. मात्र काम अर्धवट असतानाच महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यात आले आहे. मात्र आता त्याची दुरूस्ती व गटार साफ करण्यासाठी महानगरपालिकेला मोठा खर्च करावा लागत आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शुक्रवारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून सदर गटार स्वच्छ करण्यात आली आहे. मात्र वारंवार ही समस्या निर्माण होत असून महानगरपालिकेने कायमस्वरूपी समस्या दूर करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









