कोल्हापूर :
दुचाकीवरुन जात असताना पावसात छत्री उलटी होऊन दुचाकीवरुन पडल्याने महापालिकेतील महिलेचा जागीच मृत्यू झाला. मिना दिलीपराव मगदुम (वय 60 रा. ताराराणी कॉलनी, संभाजीनगर) असे मृत महिलेचे नांव आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास महाद्वाररोडवर ही घटना घडली. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मीना मगदूम या महापालिकेतील आस्थापना विभागात शिपाई पदावर कामास होत्या. मंगळवारी सकाळी मुलगा अक्षय त्यांना दुचाकीवरुन महापालिकेमध्ये सोडण्यास निघाला होता. महाद्वाररोडवर आल्यावर पाउस आल्याने मीना मगदूम यांनी छत्री उघडली. मात्र वाऱ्यामुळे छत्री उलटी झाली. यामुळे मगदूम यांचा दुचाकीवरुन तोल गेला व त्या खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली व नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. मगदूम यांना मुलगा अक्षय याने तत्काळ रिक्षातून सीपीआर रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
- तीन महिन्यांवर निवृत्ती
मीना मगदूम या महापालिकेच्या आस्थापना विभागात शिपाई पदावर नोकरीस होत्या. त्यांचा मोठा मुलगा निलेश सोनारकाम करतो, तर धाकटा मुलगा अक्षय एका मोबाईल दुकानात नोकरीस आहे. मीना मगदूम या दिवाळीमध्ये निवृत्त होणार होत्या.








