कोल्हापूर :
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मीटर रिडर उमेशचंद्र साळुंखे यांनी थकबाकीसाठी मंगळवारपेठेतील थकीत पाणी कनेक्शन बंद करत असतानाच रोहित घोरपडे याने माराहाण केली. मंगळवारी सकाळी अकरा वाजता घडलेल्या या घटनेची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून संबंधितावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्च एंडींगमुळे महापालिकेच्या घरफाळा, पाणीपुरवठ्यासह इतर विभागांनी जोरदार थकबाकी वसुली मोहीम सुरू केली आहे. महापालिकेने थकबाकीदारांसाठी विशेष योजनाही लागू केल्या आहेत. मोठ्या थकबाकीदारांचे नळपाणी कनेक्शन बंद करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. यापार्श्वभूमीवर मनपाचे पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ लिपीक उमेशचंद्र साळुंखे (वय 56 रा. शिवाजीपेठ) हे मंगळवारपेठे थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करण्यासाठी गेले होते. थकबाकीसाठी नळकनेक्शन बंद करण्यासाठी आल्याने चिडलेल्या रोहित घोरपडे (वय – 45 रा. मंगळवारपेठ, पेटकर यांच्या घरी भाडेकरु)) याने साळुंखे यांना माराहाण केली. आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. घडल्या प्रकाराने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी घटनास्थली धाव घेतली. जुना राजवाडा पोलीसात शासकीय कामात अढथळा तसेच शासकीय कर्मच्रायाला माराहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.








