मिरज :
शहरात मेलेले कुत्रे उचलण्यास विलंब केलेच्या कारणावरून महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात रॉड घालून जखमी केल्याची घटना घडली. प्रभाग दोनमध्ये माजी सैनिक वसाहत इदगाह याठिकाणी मेलेले कुत्रे उचलण्यास वेळ केलेच्या कारणावरून महानगरपालिकेच्या मानधनवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या डोक्यात रॉड घालून जखमी करण्यात आले आहे.
मनोज रामा जगताप (वय ५२) असे जखमी झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे नाव आहे. याबाबत. त्यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
शनिवारी मनोज जगताप हा कर्मचारी सकाळी भागात घंटागाडी मार्फत कचरा गोळा करण्याचे काम करत होता. यावेळी माजी सैनिक वसाहत याठिकाणी कुत्रे मरून पडले होते. माहिती मिळालेनंतर सदर कर्मचारी त्याठिकाणी कुत्रे उचलण्यासाठी गेला असता याठिकाणी रहाणाऱ्या महेशसिंग राजपूत याने कुत्रे उचलण्यासाठी वेळाने का आलास म्हणत शिवीगाळ करत डोक्यात रॉड घालून जखमी केले. तसेच सोबत असणाऱ्या महिला सफाई कर्मचारी यांना सुद्धा शिवीगाळ केली. जखमी झालेल्या मनोज जगताप या कर्मचाऱ्याला घंटागाडीतूनच उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी महेशसिंग राजपूत यांच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत शहरात महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण, दमदाटी करण्याचे प्रकार वाढले आहे. गेल्या महिन्यातच एका कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती. कर्मचारी संघटनांनी याबाबत आंदोलनही केले होते. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उपाय करण्याची मागणी केली होती.








