पिंपरी : जनमत नसताना महाराष्ट्रात 50 खोके देऊन आणि ईडीची भीती दाखवून सरकार स्थापन होते. जनतेचा कौल बाजुने नसल्याने महापालिका निवडणुका घेतल्या जात नाहीत. ही लोकशाहीची हत्या नाही का? कौल त्यांच्या बाजूने होण्यासाठी वाद निर्माण केले जातात. जातीवाद निर्माण केला जातो. त्यांची ‘बी टीम’ ठिकठिकाणी भाषणे करते आणि कौल बाजूने होताना दिसताच निवडणूक जाहीर करतात, असा आरोप काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केला.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकी रद्द केल्याचा काँग्रेसकडून निषेध केला जात आहे. त्याअंतर्गत विविध नेते राज्यभरात पत्रकार परिषद घेत आहे. पिंपरीत प्रणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मागील नऊ महिन्यात राज्यात काहीच कामे झाली नाहीत. लोकशाही विरोधातील पद्धती वापरुन लोकांवर दबाव आणला जात आहे. काहीच काम केले नसल्यामुळे धर्माचा आधार घेतला जात आहे. पेटवापेटवीचे राजकारण केले जाते. जातीयवाद निर्माण करुन, धर्माचा आधार घेऊन निवडणूक लढतात. धर्माचा, जातीचा आधार घेवून ते निवडून आले नाहीत. लोकशाही स्वीकारणाऱ्या जनतेमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका, ती कीड आमच्या देशाला लावू नका.
भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची एक विचारसरणी होती. प्रत्येकाची वेगवेगळी विचारसरणी असते. काँग्रेसचीही वेगळी विचारसरणी आहे. प्रत्येकाच्या विचारसरणीचा आदर करणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी चर्चा करुन एकत्र निवडणूक लढणार आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार देणार आहे. भाजप आणि मनसेची मिलीभगत आहे. म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळे प्रयत्न होताना दिसतील. आपण सावध राहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.








