विविध विषयांवर होणार जोरदार चर्चा
बेळगाव : महानगरपालिकेची कौन्सिल बैठक शनिवार दि. 17 रोजी सकाळी 11.30 वा. होणार आहे. या बैठकीमध्ये विविध विषयांवर जोरदार चर्चा केली जाणार आहे. याचबरोबर निधी वाटपावरूनही या बैठकीत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे आता साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. महानगरपालिकेतील सर्व स्थायी समित्यांच्या बैठका झाल्या आहेत. त्यानंतर आता कौन्सिल बैठक होणार आहे. याबाबत शुक्रवारी सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांनी चर्चा करून ही तारीख निश्चित केली आहे. तुरमुरी येथील कचरा डेपोमध्ये अग्निशमन व्यवस्था करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. याचबरोबर अध्यक्ष महापौर सविता कांबळे यांच्या परवानगीने इतर विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
लवकरच नगरसेवकांना नोटीस पाठवणार
जुन महिन्यामध्ये कौन्सिल बैठक पार पडली होती. त्या बैठकीमध्ये इतिवृत्ताचे वाचन झाल्यानंतर त्यावर चर्चा करून ठरावांना मान्यता दिली जाणार आहे. सध्या भू-भाडे टेंडरबाबत गेंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या बैठकीत त्या टेंडरवरही चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. कौन्सिल विभागाने या बैठकीची तयारी पूर्ण केली असून, आता लवकरच नगरसेवकांना नोटीस पाठवून देण्यात येणार आहे.









