बेळगाव : महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी पुन्हा एकदा व्यापार परवाना मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी शहर व उपनगरातील विविध ठिकाणच्या व्यापारी आस्थापनांना भेटी देऊन व्यापार परवान्यांची तपासणी करत आहेत. ज्या व्यावसायिकाकडे व्यापार परवाना नाही त्यांना तातडीने व्यापार परवाना घेण्याबाबत सूचना केली जात आहे. महानगरपालिकेकडून शहरातील व्यापाऱ्यांना परवाना दिला जातो. कोणत्याही प्रकारचा व्यापार किंवा व्यवसाय करायचा असल्यास महापालिकेकडून व्यापार परवाना घेणे बंधनकारक आहे. या माध्यमातून महानगरपालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होतो. मात्र, काही व्यावसायिक विनापरवाना व्यापार करत असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.
उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योजकांनी महापालिकेकडून व्यापार परवाना घेतला नसल्याची तक्रार कायम आहे. त्यांच्याकडून उद्यम परवाना घेण्यात आला आहे. मात्र, सर्व सोयीसुविधा महानगरपालिकेकडून पुरविल्या जात आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व व्यापारी व व्यावसायिकांना मनपाचा व्यापार परवाना घेण्याचे बंधनकारक असल्याचे मनपाचे मत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून व्यापार परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे परवाना नाही, त्यांनी तातडीने परवाना घ्यावा व ज्यांनी नूतनीकरण केलेले नाही, त्यांनी नूतनीकरण करून घ्यावे, असे सांगितले जात आहे. यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी विविध ठिकाणी भेटी देऊन व्यापार परवान्यांची पाहणी करत आहेत. मध्यंतरी ही मोहीम थंडावली होती. मात्र, शुक्रवारपासून शहर व उपनगरात पुन्हा व्यापार परवाना मोहीम तीव्र करण्यात आली आहे.









