मनपा कर्मचाऱ्यांचे आंदोलन जैसे थे : बैठकीनंतर दिशा ठरविणार
प्रतिनिधी/ बेळगाव
आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन शनिवार दि. 12 रोजी पाचव्या दिवशीदेखील सुरूच होते. मागण्या मान्य न झाल्यामुळे मनपा कर्मचारी संघटनेने शनिवारपासून कामबंद आंदोलन जैसे थे ठेवले आहे. रविवारी व सोमवारी कामकाज ठप्प करण्यात येणार असून सफाई विभागाकडूनही कामबंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. मंगळवार दि. 15 रोजी संघटनेची बैठक होणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
बेळगाव मनपा अधिकारी व कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी मंगळवार दि. 7 पासून सामूहिक रजेवर गेले आहेत. महापालिकेचे कामकाज बंद ठेवून ठिय्या आंदोलन केले जात आहे. दरम्यानच्या काळात आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सरकारकडून अद्याप मागण्या मान्य होत नसल्यामुळे महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांनाही याची झळ बसत आहे. बेमुदत आंदोलन मागे घ्यावे की सुरूच ठेवावे, याबाबत राज्य मनपा कर्मचारी संघटनेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंगळवारी बैठक घेतल्यानंतर पुढील रुपरेषा ठरविण्यात येणार आहे.
सफाई कामगारही आजपासून कामबंद ठेवणार
मनपा कर्मचारी संघटनेने शनिवारपासून कामबंद आंदोलन कायम ठेवले आहे. याकाळात मनपा कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे. महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जन्म-मृत्यू दाखले विभाग पूर्णपणे बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे सफाई कामगारही रविवारपासून कामबंद ठेवणार आहेत. दोन दिवस कचरा उचल होणार नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होणार आहे.









