सर्वेक्षणाच्या कामातून अधिकारी, कर्मचारी मुक्त
बेळगाव : गेल्या महिनाभरापासून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी जातनिहाय जनगणना व सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणाच्या कामात व्यस्त होते. महिनाभरानंतर कर्मचारी सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त झाले असून सोमवार दि. 3 पासून महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह विभागीय कार्यालयांचे कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. राज्य सरकारने केलेल्या सूचनेनुसार सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर सेपविण्यात आली होती. दसरा सुटीच्या काळात शिक्षकांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालविले होते. मात्र निर्धारित वेळेत सर्वेक्षण पूर्ण न झाल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा दसरा सुटीत वाढ केली. तरीही सर्वेक्षणाचे काम अपुरे राहिले. त्यामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उर्वरित सर्वेक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविली.
त्यानुसार मनपा आयुक्त शुभा बी. यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविली. गेल्या महिनाभरापासून सर्वेक्षणाचे काम सुरू होते. पण याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर झाला. अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना माघारी परतावे लागत होते. घरपट्टी वसुली व ई-खाता नोंदणीच्या कामांवरही त्याचा परिणाम झाला. मुख्य कार्यालयासह अशोकनगर, कोनवाळ गल्ली, गोवावेस येथील विभागीय कार्यालयांचे कामकाज जवळपास महिनाभर ठप्पच होते. महिनाभरानंतर सर्वेक्षणाच्या कामातून मनपा कर्मचारी मुक्त झाले असून सोमवार दि. 3 पासून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुन्हा महापालिका गजबजली आहे. विस्कटलेली कामाची घडी मूळ पदावर येण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.









