गटारींची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साचले
बेळगाव : निझामियानगर दुसरा क्रॉस, धामणे रोड येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींची व्यवस्था नसल्यामुळे गल्लीमध्ये पाणी साचत आहे. घरांसमोर दीड ते दोन फूट पाणी साचून राहत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनदेखील त्यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. गटारींची व्यवस्था नसल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावरच पाणी साचून राहत आहे. निझामियानगर परिसरात मागील दहा ते बारा वर्षांपासून रहिवासी वास्तव्यास आहेत. परंतु याठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. आठ महिन्यांपूर्वी याठिकाणी कूपनलिका खोदाई करण्यात आली. परंतु सध्या ती कार्यरत नाही. त्यामुळे येथील नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत.
निचरा होण्याची व्यवस्था केल्यास समस्या दूर
स्थानिक रहिवाशांनी अनेकवेळा महानगरपालिकेकडे लेखी तक्रार केली आहे. परंतु या तक्रारींची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. गटारी तसेच सांडपाणी निचरा होण्याची व्यवस्था केल्यास या परिसरातील समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.









