वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे : महसूल-आरोग्य खात्यात अनागोंदी कारभार
बेळगाव : महापालिकेतील अनागोंदी कारभार हा काही नवीन नाही. लोकांनाही त्याची चांगलीच कल्पना आहे. पण त्याकडे डोळेझाक केली जात असल्याने गैरकारभार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मात्र मोकळे रान मिळाले आहे. महापालिकेचा महसूल विभाग, आरोग्य व इतर विभागातील कारभार कशा पद्धतीने चालतो, हे उघड सत्य आहे. त्यामुळे मनपातील गैरकारभारावर पांघरुण घालणे शक्य नसून अशाप्रकारच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. बेळगावातील एका खासगी शिक्षण संस्थेला चलन देण्याच्या प्रकारात मनपाच्या महसूल शाखेने केलेली दिरंगाई हे अनेक गैरप्रकारांचे कारण आहे. याची गंभीर दखल घेत मनपा आयुक्तांनी महसूल उपायुक्तांसह पाच जणांना नोटीस बजावली आहे.
त्यामुळे मनपातील गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्या खासगी शिक्षण संस्थेची कराची रक्कम केवळ 20 ते 26 हजार रुपये इतकीच आहे. पण महसूल विभागाने त्याला स्वतंत्र जीएसटी जोडल्याने हा वादाचा मुद्दा बनला आहे. योग्य पद्धतीने कर वसूल केल्यास बेळगाव महापालिका राज्यातील श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक ठरू शकते. मात्र, करवसुलीत मोठ्या त्रुटी असल्याचे समोर येत आहे. मोठ्या थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून करवसुली करण्यावर मनपा अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पण काही थकबाकीदारांच्या करवसुलीत महसूल खात्याकडून गळती लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मनपातील अनागोंदी कारभाराकडे मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.









