नगरसेवक शंकर पाटील यांचा स्थायी समिती बैठकीत आरोप
बेळगाव : महानगरपालिकेकडून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या लॅपटॉपमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असतानाच वितरित करण्यात आलेल्या लॅपटॉपची बॅटरी दहा मिनिटांतच डाऊन होत आहे, असा आरोप नगरसेवक शंकर पाटील यांनी बुधवारी झालेल्या लेखा स्थायी समिती बैठकीत केला. चार दिवसांपूर्वी महापालिकेच्यावतीने स्थायी समिती सभागृहात लेखा स्थायी समितीची बैठक आयोजित केली होती. मात्र सदर बैठकीला अधिकारी गैरहजर राहिल्याने सदस्यांनी सभात्याग केला होता. त्यामुळे बैठक बरखास्त करण्याची वेळ स्थायी समितीवर आली होती. त्यामुळे सदर बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लेखा स्थायी समितीच्या अध्यक्ष रेश्मा कामकर होत्या. यावेळी उपमहापौर वाणी जोशी, नगरसेवक शंकर पाटील, सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली यांच्यासह इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरींनी विषयपत्रिकेचे वाचन करण्यासह मागच्या बैठकीतील इतिवृत्त वाचून दाखवून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी प्रथम लॅपटॉपचा प्रश्न चर्चेला घेण्यात आला.
लॅपटॉप खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप
अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून लॅपटॉपचे वितरण करण्यात आले आहे. लॅपटॉपच्या बॉक्सवर 35 हजार रुपये किंमत असली तरी सदर लॅपटॉप 48 हजार 990 रुपयांना खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे एमआरपीपेक्षा अधिक दराने लॅपटॉपची खरेदी करण्यात आल्याने यामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप नगरसेवक शंकर पाटील यांनी केला. याबाबत माहिती देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांना बोलाविण्यात आले. सदर लॅपटॉपचे थर्ड पार्टीकडून करेक्शन करण्यात आले आहे. 35 हजार रुपये लॅपटॉपचा एमआरपी दर असला तरी त्यामध्ये सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासह टीडीएस आणि जीएसटीसाठी अतिरिक्त रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे सदर लॅपटॉप प्रत्येकी 48 हजार 990 रुपयांना पडला आहे, असे सांगितले.
कमी किमतीची निविदा भरली त्याच्याकडून लॅपटॉप खरेदी
त्यावेळी उदयकुमार तळवार म्हणाले, सरकारच्या सूचनेनुसार अनुसूचित जाती जमातीतील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिले पाहिजे. मात्र, यापूर्वी झालेल्या स्थायी समिती बैठकीत पैशांऐवजी विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार लॅपटॉप उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. निविदा प्रक्रियेत आठ इच्छुकांनी सहभाग घेतला. त्यापैकी एकजण अपात्र ठरला. लॅपटॉप पुरविण्यासाठी ज्यांनी कमी किमतीची निविदा भरली होती, त्याच्याकडून लॅपटॉप खरेदी करण्यात आले.









