व्यापार परवान्यांच्या माध्यमातून उद्दिष्ट गाठण्यात अपयश : मनपा आयुक्तांकडून कानउघाडणी
बेळगाव : चालू आर्थिक वर्षात व्यापार परवान्यांच्या माध्यमातून महापालिकेच्या आरोग्य विभागाला दोन कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र उद्दिष्ट गाठणे तर दूरच, केवळ 1 कोटी 45 लाख रुपयांचा महसूल आतापर्यंत जमा झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास केवळ 12 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आरोग्य विभाग केवळ जन्म व मृत्यू दाखले वितरण करण्यातच अधिक धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त शुभा बी. यांनी डॉ. संजीव नांद्रे यांची कानउघाडणी केली आहे.
महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. थकीत घरपट्टी वसुली, हॉटेल्स, प्लास्टिक विक्री दुकानांवर कारवाई, ए आणि बी खात्यांतर्गत मिळकतीची नोंदणी या माध्यमातून महसूल गोळा करण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडे व्यापार परवाने वितरण करणे आणि नूतनीकरण करण्याची जबाबदारी आहे. या माध्यमातून 2025 या आर्थिक वर्षासाठी दोन कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मध्यंतरी मोहीम तीव्र करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांसह त्यांचे सहकारी सुस्तावले आहेत. कारवाईत सातत्य न राहिल्याने व्यापार परवाना मोहीम थंडावली आहे.
चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ 12 दिवस शिल्लक असले तरी देण्यात आलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी 55 लाख रुपयांचा महसूल जमा होणे गरजेचे आहे. त्यामुळे या दहा-बारा दिवसांत उद्दिष्ट कसे गाठणार, याबाबत महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांची कानउघाडणी केली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या आरोग्य अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी शहरातील काही भागात विविध आस्थापनांना भेटी देऊन व्यापार परवान्यांची पडताळणी केली.
ज्या व्यापाऱ्यांकडे मनपाचा परवाना नाही, त्यांना तातडीने परवाना घेण्याबाबत सूचना करण्यात आली. तर परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही, त्यांना तातडीने नूतनीकरण करून घेण्याची सूचना करण्यात आली. व्यापार परवान्यांच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र आरोग्य अधिकारी केवळ महापालिकेत बसून जन्म आणि मृत्यू दाखले वितरण करण्यातच अधिक धन्यता मानत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या उदासीन भूमिकेचा महानगरपालिकेला फटका बसत आहे. याकडे महानगरपालिका आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष देऊन सुस्तावलेल्या आरोग्य विभागाला कामाला लावणे गरजेचे आहे.









