सवलत योजनेचा फायदा, गतवर्षीच्या तुलनेत 25 कोटी घरफाळा जादा जमा
कोल्हापूर विनोद सावंत
महापालिकेची यंदाच्या आर्थिक वर्षातील घरफाळा वसुली रेकॉर्डब्रेक झाली आहे. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यापासून आतापर्यंत प्रथमच 70 कोटींचा घरफाळा जमा झाला आहे. वसुलीसाठी अजुनही पाच दिवस बाकी असल्याने यामध्ये आणखीन वाढ होणार असे चित्र आहे. सवलत योजनेमुळे वसुली होण्यास मदत झाली असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे.
एकीकडे महापालिकेमध्ये गेल्या काही वर्षापासून घरफाळा विभाग घोटाळ्याच्या आरोपावरून बदनाम होत आहे. तर दुसरीकडे वसुलीमध्ये मात्र, आघाडी घेताना दिसून येत आहे. महापूर, कोरोनामुळे घरफाळा वसुली 50 टक्केच झाली होती. यामुळे थकबाकीचे प्रमाणही वाढत होते. या वर्षी मात्र, घरफाळा विभागाची वसुलीची गाडी सुसाट आहे. महापालिकेच्या 50 वर्षात प्रथमच 70 कोटींवर घरफाळा जमा झाला आहे. सवलत योजना आणल्यामुळेच हे शक्य झाले आहे.
25 कोटींने वसुली वाढली
गतवर्षी केवळ 46 कोटींचा घरफाळा जमा झाला होता. यावर्षी 70 कोटी 61 लाखांचा घरफाळा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 25 कोटींने वसुली वाढली आहे. अद्यपही 50 हजार मिळकतींनी घरफाळा जमा केलेला नाही. संबंधितांना बिल मिळाले नसल्यास अथवा बिलात शंका असल्यान कर अधीक्षकांशी संपर्क साधून घरफाळा जमा करा आणि दंडात 40 टक्के सवलतीचा फायदा घेण्याचे आवाहन मनपाने केले आहे.
वर्ष उद्दिष्टे वसुली
2019-20 66 कोटी 24 लाख 43 कोटी
2020-21 79 कोटी 61 कोटी
2021-22 98 कोटी 46 कोटी
2022-23 99 कोटी 70 कोटी 61 लाख
एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत बिल जनरेट करून पोस्टाने 1 लाख 56 हजार मिळकतधारकांना घरपोहोच केली. याचबरोबर एक रक्कमी घरफाळा जमा करणाऱ्यांना 6 टक्के, 4 टक्के, 2 टक्के सवलत योजना टप्प्या टप्प्याने आणली. फेब्रुवारपासून 50 टक्के दंडात सवलत योजना आणली. याचबरोबर कर्मचाऱ्यांनीही वसुलीसाठी पाठपुरावा केल्यामुळेच रेकॉर्डब्रेक 70 कोटींहून अधिक घरफाळा जमा होवू शकला.
सुधाकर चल्लावाड, कर निर्धारक, महापालिका
सहा टक्के सवलत (कालावधी 1 एप्रिल ते 30 जून)
घरफाळा जमा करणारे मिळकतधारक-46 हजार 875
वसुली -26 कोटी 75 लाख लाख 92 हजार 410
चार टक्के सवलत (कालावधी 1 जुले ते 30 सप्टेंबर)
घरफाळा जमा करणाऱ्या मिळकतींची संख्या -27 हजार 3
वसुली -13 कोटी 27 लाख 56 हजार 437
दोन टक्के सवलत (कालावधी 1 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर)
घरफाळा जमा करणाऱ्या मिळकतींची संख्या-5 हजार 832
वसुली -4 कोटी
50 टक्के दंडात सवलत (कालावधी 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी)
मिळकतींना लाभ -6 हजार 358
वुसली -13 कोटी 11 लाख 3 हजार 401
40 टक्के दंडात सवलत (कालावधी 1 मार्च ते 25 मार्च)
मिळकतींना लाभ -4 हजार 988
वसुली -11 कोटी 27 लाख 46 हजार 428
एकूण वसुली -70 कोटी 61 लाख 29 हजार 834
सहा टक्के, चार टक्के आणि दोन टक्के सवलतीतून वसुली -44 कोटी
50 टक्के आणि 40 टक्के दंडात सवलतीतून वसुली -27 कोटी 50 लाख
सवलतीचा लाभ घेतलेल्या मिळकतधारकांची संख्या -99 हजार 331
दंडात सवलतीमुळे थकबाकी वसुली-18 कोटी 76 लाख 18 हजार 415
एकूण मिळकतींची संख्या -1 लाख 56 हजार
रहिवाशी मिळकती -1 लाख 20 हजार
व्यावसायिक मिळकती -35 हजार
घरफाळा घोटाळ्याची धास्ती
घरफाळा घोटाळ्याप्रकरणी 5 अधिकारी, कर्मचाऱ्यांना जेलमध्ये जावे लागले. याची धास्ती या विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या वरकमाईला वचक बसली आहे. याचाही परिणाम वसुली होण्यासाठी झाल्याची चर्चा आहे.
रिव्हीजन झाल्यास 100 कोटींवर वसुली
महापालिकेकडून यावर्षी शहरातील मिळकतींची रिव्हजन करणार आहे. वापरातील बदल, वाढीव बांधकाम आणि घरफाळा लागू नसलेल्या मिळकतींचा शोध घेतला जाणार आहे. पुढील 100 कोटींवर वसुली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









