सिंगल युज पिशव्या विकणाऱ्यांकडून 20 हजाराचा दंड वसूल
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्लास्टिकविरोधी कारवाईची मोहीम पुन्हा एकदा तीव्र केली आहे. बेकायदेशीररीत्या प्लास्टिकची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करून 250 किलो प्लास्टिक जप्त करत 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. दि. 28 रोजी मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे व आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी मेणसे गल्ली, कलमठ रोड येथील दुकानांवर कारवाई केले.
केंद्र सरकारने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी देखील अद्यापही काही दुकानदारांकडून बेकायदेशीररीत्या प्लास्टिकची विक्री केली जात आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होण्यासह अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे प्लास्टिकची विक्री करण्यात येऊ नये. लोकांनी कापडी पिशवीचा वापर करावा, यासाठी सरकारकडून जनजागृती केली जात आहे. पण अद्यापही बहुतांश जणांकडून प्लास्टिकची विक्री करण्यासह वापर केला जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शनिवारी शहरातील मेणसे गल्ली, कलमठ रोडवरील दुकानांची झडती घेत 225 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
आरोग्य खाते अॅक्टिव्ह मोडवर
संबंधित दुकानदारांवर कारवाई करत 20 हजार रुपयांचा दंडही वसूल केला. शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून शहरातील अस्वच्छ हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र करण्यात आल्याने महापालिकेचे आरोग्य खाते अॅक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसून येत आहे.









