विसर्जन मिरवणुकीदिवशी चार ठिकाणी महाप्रसाद वितरण करणार
प्रतिनिधी/ बेळगाव
सातत्याने नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरणारी महानगरपालिका प्रथमच नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरणार असल्याची सुचिन्हे दिसत आहेत. बेळगावचा सार्वजनिक गणेशोत्सव हा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतो. या उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. गणेशाचे आगमन आणि अनंत चतुर्दशीदिवशी होणारी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावमध्ये या दोन्ही दिवशी प्रचंड गर्दी होते. ही मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना यंदा महानगरपालिकेतर्फे महाप्रसाद दिला जाणार आहे. बेळगावच्या आजवरच्या गणेशोत्सवाच्या परंपरेमध्ये प्रथमच महानगरपालिकेने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. दरवर्षी मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची अनेक कारणाने गैरसोय होते. वाहतूक कोंडी, ठिकठिकाणी बॅरिकेड्स घालून अडवलेले रस्ते आणि अंतर यामुळे भाविकांना हॉटेलात जाऊन खाणे सोयीचे होत नाही. यावर्षी मात्र ही गैरसोय टळणार आहे. महानगरपालिकेने विसर्जन मिरवणुकीदिवशी चार ठिकाणी महाप्रसाद वितरित करण्याचे आयोजित केले आहे. पुलाव, एखादा गोड पदार्थ, जमल्यास भाजी असा मेनू देण्याची शक्यता दिसत आहे. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माहिती दिली आहे. तसेच महापौर, उपमहापौर आणि मनपा आयुक्त यांचे अभिनंदन केले आहे.









