गाळेधारकांना नोटीस बजाविण्याची तयारी सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र बहुतांश गाळेधारकांनी भाडे भरले नसल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे भाडे वसुलीसाठी महसूल विभागाकडून मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याकरिता गाळेधारकांना नोटीस बजाविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध ठिकाणी व्यापारी संकुलांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र बहुतांश गाळेधारक वेळेवर भाडे जमा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. भाडे भरण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने सूचना केली जाते. पण गाळेधारकांकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे. याअंतर्गत भाडे थकविलेल्या गाळेधारकांना नोटीस बजाविण्यात येणार आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून भाडय़ाची रक्कम भरली नाही. गाळे रिकामी करण्यासाठी गाळेधारकांना नोटीस बजावून मुदत दिली जाणार आहे. दिलेल्या मुदतीत भाडय़ाची रक्कम भरल्यास गाळेधारकांना मुभा दिली जाणार आहे. अन्यथा सदर गाळेधारकांकडून गाळे रिकामी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाडे थकविलेल्या गाळेधारकांना नोटीस बजाविण्याची मोहीम महसूल विभागाने हाती घेतली आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत भाडे भरावे लागणार आहे. अन्यथा गाळे रिकामी करावे लागणार आहेत.









