नगरविकास खात्याकडून निधी राखीव : मनपाकडून शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ
बेळगाव : केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात बेळगाव शहराने देशात 72 व्या क्रमांक पटकाविला आहे. पण आता नवीन ठेकेदारांकडून शहर स्वच्छतेचे काम सुरू झाल्याने सर्वांनी पुढील वर्षी बेळगाव शहर 25 व्या क्रमांकावर पोहोचेल, यासाठी प्रयत्न करावेत. नगरविकास खात्याकडून स्वच्छ प्रभाग आणि प्लास्टिकमुक्त प्रभाग स्पर्धा राबविण्याची सूचना केली आहे. यामध्ये बेळगाव महापालिकेची निवड झाल्यास राज्य सरकारकडून 1 कोटीचे अनुदान महापालिकेला दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून मंगळवारी शहर स्वच्छता कामाच्या शुभारंभप्रसंगी सांगण्यात आले.
शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील गणेश शंकर या नव्या ठेकेदाराला दिला आहे. त्यांच्याकडून 1 ऑगस्टपासून शहर स्वच्छतेचे काम सुरू झाले असले तरी, मंगळवारी चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिर जवळ रितसर प्रारंभ करण्यात आला. व्यासपीठावर आमदार आसिफ सेठ, मनपा आयुक्त शुभा बी., सत्ताधारी गट नेते अॅड. हणमंत कोंगाली, विरोधी गट नेते सोहेल संगोळी यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक व सफाई कर्मचारी उपस्थित होते. आमदार आसिफ सेठ बोलताना म्हणाले, यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बेळगाव शहर 72 व्या क्रमांकावर असले तरी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास 25 व्या क्रमांकावर पोहोचण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सफाई कामगारांनी आपले काम चोखपणे पार पाडावे.
मनपा आयुक्त शुभा बी. म्हणाल्या, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच शहर स्वच्छेतेचा ठेका एकाच ठेकेदारांकडे देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच कामाला सुरुवात केली आहे. नवीन ठेकेदारांच्या माध्यमातून कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी नवीन वाहने दाखल झाली आहे. यापूर्वी जुन्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक करावी लागत होती. सर्वांच्या सहकाऱ्यांतून बेळगाव स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंता हणमंत कलादगी म्हणाले, नगरविकास खाते बेळगाव महापालिकेला 1 कोटीचे विशेष अनुदान देण्यास तयार आहे. पण यासाठी दक्षिण आणि उत्तर भागात येणाऱ्या 58 प्रभागांमध्ये स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त प्रभाग स्पर्धा राबविण्याची सूचना केली आहे. या स्पर्धेत महापालिकेची निवड झाल्यास 1 कोटीचे विशेष अनुदान मिळणार आहे. तसे झाल्यास संबंधित प्रभागांच्या नगरसेवकांना बेंगळूरला घेऊन जावे लागणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा राबविण्यासाठी दोन पथके काम करणार असल्याचे सांगितले.









